पुणे : पुणे आणि पुण्याच्या आसपासच्या (Pune News) परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा (Leopard) वावर आहे. त्यातच बिबट्यांच्या नखाची आणि कातडीची तस्करी केल्याचे प्रकार कायम समोर येतात. असाच एक प्रकार पुण्यातील हवेली तालुक्यातील मौजे वडगावमधून समोर आला आहे.  बिबट्यांच्या नखांचे गळ्यातील लॉकेट तयार करण्यासाठी तीन अल्पवयीन मुलांनी थेट मृत असलेल्या बिबट्याचा पंजा कापला आहे. या प्रकरणी तिन्ही अल्पवयीन मुलांवर वनविभागाने गुन्हा दाखल केला आहे. 


मौजे वडगाव गावातील नवनाथ खांदवे याच्या शेतात ऊस तोडणी सुरु असताना त्यांना मृत बिबट्या दिसला. त्यानंतर लगेच त्यांनी यासंदर्भात वनविभागाकडे तक्रार केली. त्यानंतर वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन मृत मादी बिबट (वय अंदाजे 10 महिने) ताब्यात घेतले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी संपूर्ण शेताची पाहणी केली असता कुत्र्याच्या हल्ल्यात बिबट्याचा मृत्यू झाल्याचं लक्षात आलं. त्यानंतर मृत बिबट्याचे पुढील उजव्या पायाची 3 नखे तसेच मागचा उजव्या पायाचा पंजा देखील गायब असल्याचे दिसून आले.
 
पंजा कापून दिसल्याने वन अधिकाराऱ्यांना धक्का बसला. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचं ठरवलं आणि वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन श्वान पथकाच्या साहाय्याने तपास केला.  या प्रकरणात ऊस तोडणी कामगारांची त्यांना मदत लागत होती. मात्र उसतोडणी कामगारांनीच उडवा उडवीची उत्तरं दिली. शेवट या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी त्यांनी प्रत्येकाची वेगवेगळी चौकशी करण्याचं ठरवलं. त्यावेळी त्यांना एका अल्पवयीन मुलाने यासंदर्भातली माहिती दिली. आपल्या वडिलांच्या आणि सोबतच्या 2 अल्पवयीन मुलांच्या मदतीने मृत बिबट्याचे 3 नखे आणि पायाचा पंजा व त्याचे 1 नख अशी एकूण 4 नखे कोयता आणि सुरीच्या साहाय्याने कापून लपवून ठेवल्याचं सांगितलं.


लॉकेटचं आकर्षण


त्यानंतर सगळ्यांचीच सखोल चौकशी करण्यात आली आणि धक्कादायक सत्य समोर आलं. लॉकेटचं आकर्षण असल्यामुळे त्यांनी थेट बिबट्याचा पंजा कापल्याचं समोर आलं. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करुन  4 बिबट नखे 1 पायाचा पंजा व गुन्ह्यात वापरलेले 2 सुरे जप्त करण्यात आलेले आहेत. सध्या पुण्यातील आसपासच्या शहरात बिबट्यांचा वावर वाढत आहे. अनेक ठिकाणी बिबट्यांचे हल्ले होताना बघायला मिळत आहे. मात्र या तस्करांवर वनविभागाची करडी नजर आहे.


इतर महत्वाची बातमी-


Ravindra Dhangekar On Nikhil Wagle Attack : मुद्द्याची लढाई गुद्द्यावर आणू नका, निखिल वागळेंच्या गाडीवरील हल्ला पोलिसांच्या संगनमताने; आमदार रविंंद्र धंगेकरांचा गंभीर आरोप