Ashadhi Wari 2023 : येत्या काहीच दिवसात आषाढी वारीला सुरुवात होणार आहे. 10 जूनला संत ज्ञानेश्वरक महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे तर 11 जूनला संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. या पालखी सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरु झाली आहे. त्यातच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी हवेली तसेच पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे-सासवड-जेजुरी-नीरा या पालखीमार्गाला आणि पालखी तळ, विसाव्यांच्या ठिकाणांना भेटी देऊन तेथील तयारीच्या अनुषंगाने आढावा घेतला.


'उन्हाचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या'


वारकऱ्यांना कोणत्याही असुविधांना तोंड द्यावे लागू नये याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. पालखीमार्गावर आरोग्य सुविधा, पुरेसा औषध साठा, फिरत्या शौचालयांची व्यवस्था, पाणी, वीज आदी सर्व सुविधा प्राधान्याने पुरवण्यात याव्यात. दरवर्षीपेक्षा एक महिना अगोदर पालखीचे प्रस्थान होणार असल्याने उन्हाचा त्रास वारकरी भाविकांना होऊ नये यासाठी आवश्यक त्या औषधांची व्यवस्था ठेवावी, पुरेसे पिण्याचे पाण्याचा पुरवठा करण्यास प्राधान्य द्या, असे निर्देश त्यांनी दिले.


'पिण्याच्या पाण्याची योग्य सोय करा'


पालखीमार्गाच्या साईडपट्टया भरुन घेण्यासह खड्डे तसेच पाणी साचणाऱ्या ठिकाणी मुरूम आणि अन्य पर्यायांचा वापर करुन डागडुजी करावी. पालखी विसावा, मुक्काम असलेल्या गावातील पिण्याच्या पाणी योजनांसाठी अतिरिक्त राखीव पंप ठेवावेत. टँकर वाढवावेत. ऐनवेळी तांत्रिक अडचणी येऊ नयेत म्हणून पर्यायी व्यवस्था तयार ठेवावी. मार्गात आवश्यक तेथे पाण्याच्या टाक्या ठेवाव्यात. दिवे घाटाचा टप्पा पार केल्यानंतर झेंडेवाडी विसाव्याच्या ठिकाणी वारकऱ्यांना मोठा विसावा घ्यावा लागतो. त्या ठिकाणी वारकऱ्यांना विसावा घेता यावा यासाठी पुरेशी जागा उपलब्ध व्हावी म्हणून प्रशासनाने शेजारील खासगी जमीनधारकांशी संपर्क साधून व्यवस्था करावी. 


सासवड पालखीतळाची उंची वाढवण्याचे काम झाल्यामुळे पावसाचे पाणी साठण्याच्या अडचणीवर मात करणे शक्य झाले आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत राहील याकडे लक्ष द्या. पर्यायी व्यवस्था म्हणून जनरेटर ठेवावेत, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले. कऱ्हा नदीवरील पुलाच्या कामालाही जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन कामाला गती देण्याचा सूचना दिल्या. कोणत्याही परिस्थिती पुलाचे काम पूर्ण करून पालखी पुलावरून जाईल असे नियोजन सुरू असल्याचेही डॉ. देशमुख म्हणाले.


जेजुरी पालखीतळाच्या सीमाभिंतीच्या कामाची पाहणी करून हे काम वेळेत पूर्ण करा अशा सूचना त्यांनी दिल्या. डॉ.देशमुख यांनी  सासवड जवळील बोरावके मळा विसावा, वाल्हे पालखीतळ, नीरा पालखी विसावा स्थळ पाहणीदेखील केली . नीरा नदीवरील पुलाच्या संरक्षक कठड्यांची दुरुस्ती तत्काळ करून घ्या असेही त्यांनी सांगितले. हवेली तालुक्यात ऊरुळी देवाची पोलीस ठाण्याजवळील विसाव्याच्या ठिकाणाची डागडुजी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. वडकी विसावा येथे स्थायी स्वरुपात उभारण्यात आलेल्या सिमेंट काँक्रेट स्टेजचीही त्यांनी पाहणी केली.