Pune FTII News :  पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये म्हणजेच एफटीआयआयमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विश्वसंवाद केंद्रातर्फे 'द केरला स्टोरी' या सध्या देशभर गाजत असलेल्या चित्रपटाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विद्यार्थ्यांनी शोसाठी विरोध केला. काही प्रमाणात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. या चित्रपटाचे कलाकार ,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विश्वसंवाद केंद्रातील नागरिक आणि पुणेकर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मात्र याच केरला स्टोरी चित्रपटाला विद्यार्थी संघटनेने विरोध केला आणि घोषणाबाजी केली. देशात 'शिवाजी महाराज की जय' आणि 'भारत माता की जय' याला घोषणाबाजी म्हणत असाल अभिव्यक्ती स्वातंत्र्य कशाला म्हणायचं, असा प्रश्न अभिनेते योगेश सोमण यांनी उपस्थित केला. 


सध्या देशात द केरला स्टोरी या चित्रपटावरुन चांगलाच वाद निर्माण झाला आहे. अनेकांनी विरोधदेखील केला आहे. त्यातच मागील सहा दिवसांपासून फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) मधील तीन विद्यार्थी  बेमुदत उपोषणावर आहेत. उपोषणाला 6 दिवस पूर्ण झाले आहेत. संस्थेने एका विद्यार्थ्याला बॅचमधून काढून टाकल्याचा आरोप या विद्यार्थांनी केला आहे. उपोषणाला बसलेल्या तीन मुलांपैकी एकाची प्रकृती खालावल्याने त्याला रुग्णालयातदेखील दाखल करण्यात आले आहे. या उपोषण स्थळाच्या शेजारीच असलेल्या थिएटरमध्य़े हा शो आयोजित करण्यात आला असल्याने या विद्यार्थ्यांनी हा शोला विरोध केला. चित्रपटाचा शो सुरू होण्यापूर्वी काही जणांनी लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उद्विग्न होऊन, निदर्शने करीत घोषणाबाजी करणाऱ्यांना कॅम्पसच्या बाहेर काढण्याची जोरदार मागणी केली. यावेळी अभिनेते योगेश सोमणदेखील उपस्थित होते. 


विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे?


'द केरला स्टोरी' हा चित्रपट विशिष्ट समाजाला दोषी दाखवण्याचा प्रयत्न असून, त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आंदोलन केल्याचा आरोप विद्यार्थी संघटनेने केला आहे. संस्थेने खाजगी फिल्म सोसायटीला विद्यार्थ्यांच्या हक्काचे चित्रपटगृह भाडे तत्वावर दिलेच कसे, असा प्रश्नही विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. समाजातील एका घटकाला दुखावणारा हा चित्रपट आहे. बाहेरच्या लोकांना भाड्याने विद्यार्थ्यांचे थेटर देण्यात आले आहे आणि या विद्यार्थ्यांच्या थेटरमध्ये चित्रपट दाखवण्याची काय गरज आहे, असा प्रश्न विचारत विद्यार्थ्यांनी शो दाखवण्यासाठी विरोध केला आहे. 


मोठा पोलीस बंदोबस्त तैनात...


'द केरला स्टोरी' या चित्रपटावरुन वाद सुरु आहे. त्याच चित्रपटाच्या स्क्रिनिंग दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या परिसरात मोठा बंदोबस्त करण्यात आला होता. एवढा बंदोबस्त असतानादेखील परिसरात काही वेळ विद्यार्थी आणि विश्वसंवाद केंद्राच्या लोकांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी मध्यस्थी करत वाद मिटवला. 


संबंधित बातमी-


Pune FTII Hunger Strike : FTII विद्यार्थ्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस, एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली