पुणे : पुण्यातील पी एम पी एम एल संचलन तूट गेल्या आर्थिक वर्षात 500 कोटी रुपयांवर गेली आहे. मात्र डबघाईला आलेल्या परिस्थितीत अधिकाऱ्यांना स्वत:च्या केबिन नव्या करण्यात कुठलीच चूक वाटत नाही. पी एम पी एम एल मध्ये सुरू असलेली उधळपट्टी, आधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा या सगळ्यामुळे पुणेकरांच्या कराचे पैसे पाण्यात जात आहेत का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
पुणेकरांची लाईफ लाईन म्हणून ओळखली जाणारी पी एम पी एम एल बस सेवा गेल्या काही वर्षांपासून तोट्यात आहे. पुण्यातील हजारो नागरिक या बस सेवेचा लाभ घेत असतात. मात्र प्रवाशांसाठी कुठलीही सेवा पी एम पी एम एलकडून देण्यात येत नाही. मोडलेले सीटे, गळके बस स्टॉप, वारंवार ब्रेक डाऊन होणारी बस यासारख्या अनेक समस्या पुणेकरांना रोज भेडसावत असतात. मात्र समस्या दूर करण्याऐवजी पीएमपीएमएलमधले अधिकारी स्वतःच्या केबिनचे नूतनीकरण करण्यात व्यस्त आहेत असं दिसतंय.
पीएमपीएमएल मधील सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चेतना केरुरे यांचे केबिन आलिशान पद्धतीनुसार सजवण्यात आले. केबिनमध्ये आरामदायी खुर्च्या तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी विशेष हॉल तसेच आराम करण्यासाठी एक महागडा सोफासेट देखील बसवण्यात आलाय. या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या केबिनच्या नुतनीकरणाचा खर्च जवळपास 25-30 लाख रुपयांपर्यंत गेलाय असा दावा सामाजिक कार्यकर्ते उज्वल केसकर यांनी केला आहे. या गोष्टीची पडताळणी करण्यासाठी जेव्हा आम्ही सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.चेतना केरुरे यांच्या केबिनमध्ये विचारले असता त्यांनी या केबिनसाठी 30 लाख रुपये नव्हे तर 15 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत असं त्यांनी सांगितले. केबिनचे नूतनीकरण करण्याची गरज होतीच त्याचबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग साठी एक खास जागा हवी होती त्यासाठी हे सगळं बांधण्यात आलेला आहे.
पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिका मिळून तयार केलेली कंपनी आता या महापालिकांची डोकेदुखी होऊन बसली आहे. दरवर्षी ढिसाळ नियोजनामुळे कोट्यावधी रूपयांच्या आर्थिक तुटीचा भुर्दंड या दोन्ही महापालिकांना भोगावा लागतोय. गेल्या वर्षीच्या 500 कोटीच्या तुटीचा आकडा हा इतिहासातला अभूतपूर्व आकडा आहे. या तुटीमुळे दोन्ही महापालिकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
आर्थिक विवंचनेत सापडलेली पी एम पी एम एलची गाडी आता पुन्हा मार्गावर आणणार तरी कोण असा प्रश्न पडणं साहजिक आहे. कारण या पी एम पी एम एलला याआधी अनेक अधिकारी लाभले ज्यांनी मंडळाला आर्थिक नफा द्यायचा खूप प्रयत्न केला. मात्र आता जे अधिकारी त्यांच्या केबिनचे नूतनीकरण व्यस्त असतील तर 'पी एम पी एम एल'चे चाक 'आर्थिक गाळात जाईल ही शक्यता नाकारता येत नाही.