पुणे : सांगली आणि जळगावनंतर पिंपरी चिंचवडमध्ये भाजप नगरसेवकांमध्ये अस्वस्थता समोर येऊ लागली आहे. बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक रवी लांडगे यांनी शहरभर पोस्टरबाजी करून उघड नाराजी व्यक्त केली आहे. 'हे माझं चुकलं का?' असा सवाल करत भाजपला त्यांनी घरचा आहेर दिलाय. त्यामुळे हे पोस्टर सध्या शहरभर चर्चेचे विषय ठरत आहेत. रवी लांडगे यांनी केलेली ही पोस्टरबाजी आगामी काळात भाजपला अडचणीची ठरू शकते. याआधी ही भाजपच्या काही नगरसेवकांनी स्वपक्षाला कोंडीत धरलेलं आहे. 2022च्या निवडणुकीपूर्वी वाढत चाललेली नाराजी पक्षाची डोकेदुखी वाढवणारी ठरत आहे.


2017च्या महापालिका निवडणुकीत रवी लांडगे हे एकमेव बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक आहेत. त्यांच्या रूपाने भाजपने शहरात खातं उघडलं आणि नंतर इतिहासात पहिल्यांदाच पिंपरी चिंचवड महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला. दिवंगत अंकुशराव लांडगे यांनीच शहरात भाजपा रुजवली, आज ही त्यांचं कुटुंब भाजपशी एकनिष्ठ आहे. रवी लांडगे हे त्यांचेच पुतणे आहेत. त्यामुळे इतिहासात पहिल्यांदा भाजपला सत्ता मिळाली तेव्हा लांडगे कुटुंबातील सदस्याला पालिकेतील एक प्रमुख पद मिळावं, अशी ते आशा बाळगून होते. तसा त्यांना भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार महेश लांडगे यांनी शब्द दिला होता. असा दावा नगरसेवक रवी लांडगे यांनी अनेकदा केला. पण चार वर्षे सरली आणि यंदा शेवटची संधी होती. त्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी ते तीव्र इच्छुक होते. मात्र त्यांना यावेळी ही डावलण्यात आले. मग त्यांनी स्थायी समितीच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला अन पत्रकार परिषद घेत, शहराध्यक्ष आणि आमदार महेश लांडगे यांनी शब्द पाळला नाही. अशी उघड नाराजी व्यक्त केली. तर आता "चाळीस वर्षांपासून आमचं कुटुंब भाजपची सेवा करतंय, हेच आमच्या कुटुंबाचं चुकलं का?, सोयीचं राजकारण नाही तर स्वाभिमानी राजकारण अंगीकृत केलं, गोरगरिबांसाठी बांधलेल्या रुग्णालयाच्या खाजगीकरणाला विरोध केला, हे माझं चुकलं का?" असे अनेक प्रश्न पोस्टरद्वारे विचारले आहेत. शहरभर झळकलेले हे पोस्टर भाजपला घरचा आहेर देत आहेत.


पिंपरी चिंचवड भाजपमध्ये एकटे रवी लांडगे नाराज आहेत असं नाही. तर नगरसेवक शितल शिंदे यांनी देखील स्थायी समितीच्या अध्यक्षपदी डावलले म्हणून थेट बंडखोरी केली होती. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या साथीने अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ते उभे ठाकले होते. नंतर सदस्य पदाचा राजीनामा ही दिला होता. नाराज नगरसेविका माया बारणे यांनी देखील नुकतंच शिक्षण समिती सदस्य पदाचा राजीनामा दिलाय. नगरसेवक तुषार कामठे यांनी भाजप विरोधातच आंदोलन केलं होतं, तेव्हा त्यांना राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं पाठिंबा दिला होता. नगरसेवक संदीप वाघेरे यांनी कोरोनाच्या काळात पालिकेच्या रुग्णालयात गॅस पाईपलाईनच्या टेंडरमध्ये अनियमितता आढळल्याचा आरोप करत चौकशीची मागणी केली होती. याशिवाय सर्व साधारण सभेत भाजपच्या धोरणावर त्यांच्याच काही नगरसेवकांनी उघड भाष्य केल्याचं अनेकदा पहायला मिळालंय तर नवे विरुद्ध जुने हा संघर्ष ही वेळोवेळी उफाळून येत असतो. तसेच भाजपशी संलग्न असलेले अपक्ष नगरसेवक नवनाथ जगताप आणि कैलास बारणे हे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असल्याचं दिसून आलं आहे. 


नगरसेवक रवी लांडगे नाराज होणं स्वाभाविक आहे, पण एकाला संधी देताना इतर इच्छुक नाराज होत असतात. भाजप रवी लांडगे यांना न्याय देऊन, त्यांची नाराजी लवकरच दूर करेल. असा दावा सभागृह नेता नामदेव ढाके यांनी केलाय. तर सर्व साधारण सभेत आमचे नगरसेवक पक्षविरोधी नव्हे तर प्रशासनाचा गैर कारभार समोर आणतात. भाजपमध्ये लोकशाही असल्याने आम्ही नगरसेवकांना व्यक्त होण्याची मुभा देतो, असं ही ढाकेंनी स्पष्टीकरण दिलं.


भाजपच्या हातात असलेल्या सांगली महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महापौर विराजमान झाले तर जळगाव महापालिकेत शिवसेनेचे महापौर विजयी झाले.  महाविकासआघाडीने भाजपला एकामागेएक असे धक्के दिले. ही पार्श्वभूमी पाहता पिंपरी चिंचवड भाजपमधील नगरसेवकांने केलेली ही फ्लेक्सबाजी आणि त्यानिमित्ताने अस्वस्थ नगरसेवकांबाबत रंगलेली चर्चा, ही आगामी काळात भाजपसाठी धोक्याची घंटा मानली जाते. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :