Pune News: पुण्यात पावसाचे थैमान घातलं असतानाच आता दुसरीकडे साथीच्या रोगांनी डोकेदुखी वाढवली आहे. पुणे शहरात डेंग्यूचे आणि झिकाच्या (Zika Virus) रुग्णसंख्येत वाढ झाली असून पालिका प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. पुण्यात डेंग्यूचे 389 संशयित रुग्ण आळढून आलेत तर झिका रुग्णांची (Zika Virus) रुग्णसंख्या 37 वर पोहोचली आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर जून महिन्यापासून डेंग्यू रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. अशातच आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. झिकाबाधित (Zika Virus) असलेल्या दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 


झिकाबाधित (Zika Virus) असलेल्या दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला त्यांना झिकाबरोबरच इतरही सहव्याधी असल्याची माहिती आहे. या नागरिकांना हृदयाचा आणि यकृताचा आजार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांचा मृत्यू झिकामुळे झाला की, इतर कशामुळे झाला याबाबतची तपासणी आरोग्य विभागाकडून केली जात आहे. 


पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला पत्र लिहिले आहे. रविवारी आणखी 8 झिकाचे (Zika Virus) रुग्ण आढळून आले आहेत, रुग्णांची संख्या 45 वर पोहचली आहे. मृत्यू झालेले पेशंटचे वय हे 71 वर्षांपेक्षा जास्त होते. त्यापैकी एक रुग्ण सह्याद्री हॉस्पिटल आणि दुसरा रुग्ण हा जोशी हॉस्पिटलमध्ये दाखल होते. त्याचा 14 जुलै रोजी मृत्यू झाला होता. 


जोशी रुग्णालयातील रुग्ण वारजे येथील असून, 14 जुलै रोजी उच्च रक्तदाबासह आरोग्यासंबंधीच्या आजारांमुळे त्यांना मृत घोषित करण्यात आले होते, तर 19 जुलै रोजी त्यांच्या नमुन्यांमध्ये 'झिका संसर्गा'चे निदान झाले होते. दुसरा रुग्ण खराडी येथील असून, त्याला सह्याद्रीमध्ये दाखल करण्यात आले होते. 21 जुलै रोजी  त्यांना मृत घोषित केले. त्यांचे देखील झिकाचे निदान झाले.


झिकापासून बचाव कसा कराल?



झिकापासून बचाव करण्यासाठी आरोग्य विभागाने नियमावली जाहीर केली आहे. घरामध्ये डास होणार नाही, याची काळजी घ्या. घरात स्वच्छता ठेवा. मच्छरदाणीचा जास्तीत जास्त वापर करा. घरात साठवलेले पाणी जास्त काळ ठेवू नका. घराच्या खिडक्या आणि दरवाज्यांना जाळी लावा. आपल्या परिसरातदेखील स्वच्छता बाळगण्याचं आवाहन झिका (Zika Virus) आणि डेंग्युच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलं आहे. झिका व्हायरसचा (Zika Virus) धोका गर्भवती माता आणि तिच्या गर्भाला जास्त असल्यामुळे त्यांच्या तपासणीसाठी आरोग्य विभागाने भर दिला आहे. झिकाच्या एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक प्रमाण हे गर्भवती मातांचे आहे. 


झिका विषाणूपासून (Zika Virus) बचाव करण्यासाठी घराभोवती पाणी साचू देऊ नका. पाणी साचलेल्या ठिकाणी डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. घरामध्ये डास शिरणार नाही याची काळजी घ्या. डास चावणार नाही याची काळजी घ्या. घरात डास आले तर त्यासाठी कडुलिंबाचा पाला जाळा. संध्याकाळी दारे खिडक्या उघड्या ठेऊ नका. कापूराचा वापर करून तुम्ही १५ ते २० मिनिटात डासांना दूर पळवू शकता. कडुलिंब आणि नारळाचं तेल एकत्र करून आपल्या शरीरावर चोळा. दोन दिवस ताप राहिल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. 


पुण्यात आठ रुग्ण पॉझिटिव्ह


शहरात आणखी 8 रुग्णांचा अहवाल झिकासाठी पॉझिटिव्ह आला असून, त्यामध्ये दहा वर्षाच्या बालकाचाही समावेश आहे. खराडी येथील 28 वर्षीय महिला, कोथरूड येथील 80 वर्षीय महिला, शिवाजीनगर येथील 54 वर्षीय महिला, 25 वर्षीय महिला, शिव शंभू नगर 3 येथील 34 वर्षीय महिला, 73 वर्षीय पुरुष, 74 वर्षीय महिला व फातिमानगर येथील एका 29 वर्षीय महिलेला झिका संसर्गाची (Zika Virus) लागण झाली आहे.