Mumbai Pune Express Highway Accident : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील जळीतकांडाचा आणखी एक थरारक व्हिडीओ समोर आला आहे. केमिकलचा टँकर मार्गावरून हटवणारी क्रेन कशी पेटली हे या दृश्यात कैद झालं आहे. सुदैवाने बचाव पथकातील सर्व सदस्य थोडक्यात बचावले. रेस्क्यू ऑपरेशन करताना बचाव पथकांचा जीव कसा धोक्यात असतो, हे यातून दिसून येत आहे.




अपघातानंतर पेट घेतलेल्या मिथेनॉलच्या टँकरची आग आटोक्यात आली. त्यानंतर क्रेनच्या साहय्याने हा टँकर मार्गाखाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्याचवेळी टँकरमधील उरलेले केमिकल मार्गावर पुन्हा पसरले आणि त्या केमिकलने पुन्हा एकदा पेट घेतला. अचानकपणे पेट घेतल्यानं बचाव पथकातील सदस्यांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली. क्रेन चालकाने ही तातडीनं बाहेर उडी घेत स्वतःचे प्राण वाचवले. 


रेस्क्यू ऑपरेशन वेळी बचाव पथकांचा जीव कसा धोक्यात जाऊ शकतो? हे तर यातून स्पष्ट दिसलंच मात्र हे कार्य करताना कसं प्रसंगावधान राखावे लागते,  हे देखील या बचाव पथकाने दाखवून दिले. अग्निशमन दलाचे जवान आणि अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणाऱ्या बचाव पथकाच्या हे थरारक रेस्क्यू ऑपरेशन पार पाडले.


थरारक रेस्क्यू ऑपरेशन...


मंगळवारी (13 जून)  दुपारी 12 वाजून 50 मिनिटांनी हा अपघात घडला. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी आणि अग्निशमनदलाने बचावकार्य सुरु केलं होतं. या टँकरची आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेडला फोमच्या गाडीची आवश्यकता होती. मात्र IRB यंत्रणा पाण्याच्या टँकरने आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. शेवटी आग चांगलीच धुमसल्याचं पाहून यंत्रणांनी पुन्हा पाण्याचा मारा सुरु केला. हे सगळं सुरु असतानाच मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आग आटोक्यात आली. आग आटोक्यात आणणं अग्निशमन दलाच्या जवानांपुढे मोठं आव्हान होतं. पावसामुळे हे काम सोपं झालं. एवढं असूनही कुलिंगसाठी फार वेळ लागला. कुलिंग झाल्यावर क्रेनच्या साहय्याने टॅंकर रस्त्यांच्या बाजूला करण्यात आला. त्यानंतर टॅंकरचा झालेला कोळसा कर्मचाऱ्यांनी उचलला आणि तब्बल पाच तासांनी हे रेस्क्यू ऑपरेशन संपलं.


तिघांचा जीव कोणामुळे गेला?


पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील जळीतकांडाने एका कुटुंबावर घाला घातला आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. त्यात माय लेकासह भाच्याचा समावेश होता. होरपळलेल्या जखमींना द्रुतगतीवरील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार मिळणं अपेक्षित होतं. मात्र हा पांढरा हत्ती फक्त मलमपट्टीच्या कामाचा असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.