पुणे : पुणेकरांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मोठी घोषणा केली आहे. पुण्यातील आयटी पार्क आणि हिंजवडी परिसरातील कंपन्यामध्ये पोहचण्यासाठी स्कायबस हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे मेट्रोला पुरक सेवा मिळेल. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच या प्रकल्पाचं भूमिपुजन केलं जाईल, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. त्यासोबतच पुणे कॅन्टॉन्मेट बोर्डाचे सर्व प्रश्न सोडवले जातील आणि सगळ्या तरतुदी पाहून निधीसाठी पाठपूरावा करुन बैठक घेतली जाईल, असं अश्वासनही उपमुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. 


वर्षभरात मेट्रोचे काम पूर्ण करणार


पुणे शहरात 24/ 7 पाणी पुरवठा योजना, नदी सुधार कार्यक्रम यासारख्या विविध प्रकारच्या योजना राबवून विकास कामांच्या माध्यमातून शहराचे चित्र बदलण्याचे काम सुरु आहे. पीएमपीएलच्या माध्यमातून देशातील पहिली इलेक्ट्रीक बसची फ्लिट पुणे शहरात केली आहे. पुण्याचे या मॉडेलची देशात अंमलबजावणी करण्यात येत असून विविध शहराने ते स्वीकारले आहे. मेट्रोचे कामे अतिशय गतीने करण्यात येत आहे. सिव्हील कोर्ट ते स्वागेट मेट्रोचे मुठा नदीच्या गर्भातून भुयारी चाचणी घेण्यात आली असून येत्या काळात मेट्रोचे तीन्ही मार्ग मिळून एकूण 54 कि.मीचे मेट्रोचे जाळे सुरु करण्यात येत आहे. येत्या वर्षभरात टाटाच्या मेट्रोचे काम पूर्ण करण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.


रिंग रोडमुळे अर्थव्यवस्था निर्माण होणार


पुण्यातील रिंग रोडमुळे  पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीए  (Pune Ring Road)  क्षेत्रात विकासाच्या नवीन संधी तसेच अडीच लाख कोटी रुपयांची अर्थव्यवस्था नव्याने निर्माण होणार आहे; हा मार्ग येत्या काळात पुण्याच्या विकासाचे ते इंजिन ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra Fadanvis) यांनी व्यक्त केला


फडणवीस म्हणाले, पुणे रिंगरोड महत्वाचा असून त्यासाठी 80 टक्के भूसंपादनापर्यंत पूर्ण होत आहे. येत्या काळात या मार्गाचे काम सुरु करण्यात येणार आहे. आयटीपार्कच्या भागात आस्थापनांपर्यत जाण्यासाठी मेट्रोला जोडून स्कायबस सुरू करण्यात येणार असून येत्या काळात भूमीपूजन करण्यात येणार आहे. यामुळे आस्थापनांपर्यंत जाण्यासाठी वाहनाची आवश्यकता लागणार नाही आणि  प्रदुषण होणार नाही. वाहतूक नियोजनासाठी मेट्रोला कनेक्टिव्हिटी देण्याचे काम करण्यात येणार आहे.  खोपोली ते खंडाळा  दरम्यान 9 किमी मिसिंग लिंकचे काम करण्यात येत असून यामुळे मुंबई-ते पुणे दरम्यान अंतर कमी होऊन वाहतुकीचे प्रश्न सुटणार आहे. 


पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात संरक्षण विभागाचा भाग असल्याने निर्बंध असून महानगरपालिका आणि शासनाला विकास करतांना समस्या निर्माण होत आहे. महानगरपालिकेप्रमाणे दिल्या जाणाऱ्या वस्तु व सेवाकर स्वरुपात परतावा दिला जातो त्याप्रमाणे कॅन्टोन्मेंट मंडळाला निधी मिळण्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल. महानगरपालिका क्षेत्रातील योजना कॅन्टोन्मेंट मंडळाला लागू करण्याबाबत येत्या काळात पुणे महानगरपालिका, नगर विकास विभाग आणि सर्व संबंधित विभागासोबत बैठक घेण्यात येईल, अशा कॅन्टोन्मेंट मंडळातील प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.


 



 


इतर महत्वाची बातमी-


Ajit Pawar On Pune Crime : परेड काढूनही कोणाची मस्ती असेल तर पोलीसी खाक्या दाखवायला लागेल; अजित पवारांकडून गुन्हेगारांना तंबी