पुणे : पुण्यातील कोथरूड पोलिसांनी तीन मुलींना मारहाण आणि जातीवाचक शब्दात शिवीगाळ केल्याचा आरोप मुलींनी केला आहे. कारवाईच्या मागणीसाठी त्या मुली सकाळपासून पोलीस आयुक्तालयात बसून आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर, युवा नेते सुजात आंबेडकर, आमदार रोहित पवार यांनी त्या मुलींच्या उपस्थितीत पोलिसींची भेट घेऊन कारवाईची मागणी केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 23 वर्षीय विवाहित महिला आपल्या पतीकडून होणाऱ्या सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून पुण्यात आली होती. त्या मुलीला मदत केलेल्या तीन मुलींना स्थानिक पोलिसांकडून कोणतीही पूर्वसूचना न देता ताब्यात घेतलं गेलं . तसेच त्या महिलांवर पोलीस स्टेशनमध्ये जातीवाचक शिवीगाळ, मारहाण आणि लैंगिक अपमान केल्याचा आरोप मुलींनी केलाय.
सहायक पोलिस निरीक्षक प्रेमा पाटील, संभाजीनगर पोलिस स्टेशनचे अमोल कामटे आणि छत्रपती संभाजीनगर येथील महिला कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे यांच्यावर थेट मारहाणीचे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दखल घेत त्या मुलींशी फोनवरुन केली चर्चा करुन कारवाईचं आश्वासन दिलं आहे. रुपाली चाकणकर या प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील पोलीस उपायुक्तांशी चर्चा करुन एफआयर दाखल करण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे.
तथ्य असल्यास कारवाई करु : पोलीस उपायुक्त संभाजी कदम
पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी या प्रकरणात तथ्य असेल तर कारवाई करू असं सांगितल आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि पोलीस उपयुक्त संभाजी कदम हे या प्रकरणी काय कारवाई करतात पाहावं लागेल.
सुजात आंबेडकर काय म्हणाले?
वैष्णवी हगवणे प्रकरण जेव्हा गाजलं तेव्हा सामाजिक कार्य करणाऱ्या मुलींनी नंबर व्हायरल केले. त्या सामाजिक कार्य करणाऱ्या मुलीशी संपर्क करण्यात आला. ती मुलगी त्या मुलीकडे गेली. पोलिसांनी चौकशी करताना त्यांना मारहाण केली.जातीवाचक बोललं गेलं, अत्यंत खालच्या दर्जाचे बोललं गेलं. त्या मुलींपैकी एकीला जातीवाचक बोलत उभे केले गेले, एका पोलीस इन्स्पेक्टरनं तुमचा असा अटिट्युड असेल तर तुमचा मर्डर होईल अशी धमकी दिली गेलल्याचा आरोप सुजात आंबेडकर यांनी केला आहे.
सुजात आंबेडकर पुढं म्हणाले, त्या तीनही मुलींना घर मालकांनी रस्त्यावर काढलं आहे. पोलीस ऑफिस करसपॉन्डेड देत नाहीत.
तीन दिवसांपासून त्या तक्रार दाखल करून घ्या म्हणताय पण ते होत नाही. पोलीस दडपशाही करत आहे, असा आरोप सुजात आंबेडकर यांनी केला. अट्रासिटी दाखल करत नाहीत. जोपर्यंत एफआयर दाखल होत नाही तो पर्यंत आम्ही पोलीस आयुक्तालय सोडणार नाही, असं सुजात आंबेडकर म्हणाले. पोलिसांकडून 48 तासांचा वेळ मागितला जात आहे. राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे होऊ शकत नाही, असंही सुजात आंबेडकर म्हणाले.