पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मालेगाव बॉम्बस्फोटातील (Bomblast) आरोपी ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली असून आज त्यांचं पुण्यातील (pune) निवासस्थानी आगमन झालं. त्यामुळे, हिंदूत्ववादी संघटना व त्यांच्या समर्थकांनी पुण्यातील निवासस्थानाच्या बाहेर जल्लोष करत त्यांचे स्वागत केले. यावेळी, पुरोहित यांच्या उपस्थितीत शोभायात्रा देखील काढण्यात आली असून स्वतः पुरोहित या शोभायात्रेत सहभागी झाले होते. पुण्यातील भाजप नेत्या आणि राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी (Medha kulkarni) यांनीही कर्नल पुरोहित यांच्या घरी जाऊन त्यांचे अभिनंदन व स्वागत केले. यावेळी, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावर भाष्य करताना त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. तसेच, द कश्मीर फाइल्सप्रमाणेच द मालेगाव फाइल्स हा सिनेमा काढायला हवा, अशी मागणी देखील त्यांनी केली.  

सर्वोच्च न्यायालयाने मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर राजकीय वातावरण तापले असून भाजपसह महायुतीमधील नेते काँग्रेसवर टीका करत आहेत. काँग्रेस सरकारच्या काळात हिंदुत्त्ववाद्यांना जाणीपूर्वक अडकविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे भाजप नेत्यांनी म्हटलं. त्यावरुन, राजकीय टीका टिपण्णी सुरू असतानाच खासदार मेधा कुलकर्णी यांनी मोठी मागणी केली आहे. कर्नल पुरोहित यांच्या निवासस्थानी त्यांचे स्वागत केल्यानंतर माध्यमांशी बोलताना कुलकर्णी यांनी आपली भूमिका मांडली. 

'कश्मीर फाईल्स' सारखाच मालेगाव फाईल्स हा सिनेमाही झाला पाहिजे अशी मागणी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी आज केली आहे. पुण्यात मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी असलेले कर्नल पुरोहित यांची निर्दोष सुटका झाल्यानंतर पुण्यात आज त्यांच्या घरी जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी खासदार मेधा कुलकर्णी यांनीही त्यांचं स्वागत केलं. यावेळी, बोलताना काश्मीर फाइल्स सारखाच मालेगाव फाइल्स हा सिनेमा काढावा, अशी मागणी त्यांनी केली. कारण काँग्रेसने त्यांच्या काळात फेक नेरटीव्ह पसरवले होते, त्यांचे पितळ उघडं पाडण्यासाठी मालेगाव फाइल्स हा सिनेमाही आलाच पाहिजे, असं मत खासदार कुलकर्णी यांनी व्यक्त केले. 

मला स्वत:ला सिद्ध करायचं होतं ते मी केलं - पुरोहित

माझ्या सोसायटीमध्ये या लोकांनी माझं स्वागत केलं, इथेच मी जन्मलो आणि इथेच वाढलो. ही सोसायटी माझ्यासाठी परिवार आहे, ही लोक माझ्या खूप दिवसांपासून मागे लागली होती की माझं कौतुक त्यांना करायचा आहे. पण, केस संपल्याशिवाय मी सत्कार स्वीकारणार नाही, असं मी त्यांना सांगितलं होतं. हे या परिवाराचं माझ्यावरचं प्रेम आहे, असे म्हणत स्वागत करणाऱ्यांचे कर्नल पुरोहित यांनी आभार मानले आहेत. माझ्यावर जेवढे काही आरोप झाले, त्यावेळी सुद्धा हे लोक माझ्यामागे उभा टाकले होते. एवढे आरोप होऊन सुद्धा मला या लोकांनी आज पुन्हा स्वीकारलं हे त्यांचं कौतुक आहे. आमच्यावरती वाटेल ते आरोप केले, त्यांनी त्यांचं काम केलं, मी माझं काम केलं. माझा पक्ष जो होता तो मी कोर्टात माझ्या वकिलांमार्फत मांडला. मला स्वतःला सिद्ध करायचं होतं ते मी केलं. कोर्टाने सत्य स्वीकारलं, जर काही चुकीचं असत तर कोर्टाने मला दोषी ठरवलं असतं. झालेल्या गोष्टी संपल्या त्या चर्चा मी कधीच करत नाही आणि करणार नाही, अशी प्रतिक्रिया पुरोहित यांनी पुण्यातील स्वागतानंतर दिली. 

हेही वाचा

हॅपी फ्रेंडशिप डे म्हणत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं; संजय शिरसाटांना आता अर्थखातं मिळणार?