पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना मुलींवर हात टाकणाऱ्यांबाबत एक वक्तव्य केलं आहे.'मुलींवर हात टाकणाऱ्यांचे हातपाय तोडून त्यांना पोलिसात दिले पाहिजे', पालकांनी मुलामुलींना शाळेत पाठवायला घाबरु नये असं देखील ते म्हणाले आहेत. आपली सत्ता नसेल तरी राज ठाकरे सत्तेत आहेत, असंही वक्तव्य अमित ठाकरेंनी केलंय.
अमित ठाकरे काय म्हणाले?
मला आज खरंतर विद्यार्थी सेनेचे आभार मानायचे आहेत तुम्ही एक उत्तम कार्यक्रम घेतला आहे, असं अमित ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष झाल्यापासून एकच स्वप्न होतं की आपण विद्यार्थी विद्यार्थिंनी पर्यंत पोहोचावं. तुम्ही माझं स्वप्न साकार करत आहात. मी तुमच्यामुळं आहे, माझ्यामुळं तुम्ही नाही आहात, असं अमित ठाकरेंनी स्पष्ट केलं. मी पालकांशी बोलायला आलोय, जे माझं स्वप्न आहे, मुलगा आणि मुलगी शाळेत गेल्यावर ते सुरक्षित असावेत. महाविद्यालयात गेल्यावर ते सुरक्षित असावेत, त्यांच्या आयुष्यात अडचणी नसाव्यात. काही गोष्टी पालकांपर्यंत पोहोल्या नाही तर आम्ही आहोत. हे सांगायला आज आलोय आहे, असं अमित ठाकरेंनी पालकांसोबत संवाद साधताना म्हटलं. पालक म्हणून मुलाला काय झालं?, मुलीला काय झालं? मुलाला काय झालं तर पुढे काय? उशिरा फोन आला तर पुढं काय अशी भीती पालकांना असते. माझा मुलगा शाळेत जाणारे त्यामुळं मला हे माहिती आहे, असं ते म्हणाले.
मुलींवर हात टाकणाऱ्याचे हात पाय तोडून पोलिसांकडे द्या : अमित ठाकरे
महेशजी तुम्ही जसं बोललात, इकडे आता मुलींवर हात टाकण्याच्या घटना वाढल्या आहेत, त्यांचे हात पाय तोडून तुम्ही पोलिसांना दिले पाहिजे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात राहतो. त्या मुलांचे हात पाय मोडून पोलिसांकडे दिले पाहिजेत. हे राज्य असं नाही की मुलींवर हात टाकू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही शाळेत जर पाठवत असाल, महाविद्यालायता पाठवत असाल तर आपली सत्ता नसेल तरी राजसाहेब सत्तेत आहेत. ही गोष्ट तुम्ही विसरु नका. आम्ही तुमच्या संपर्कात असू हे तुम्हाला वचन देतो, पालकाशी बोलायला आलोय मुलांना शाळेत पाठवायला, महाविद्यालयात पाठवायला घाबरु नका आम्ही आहोत, हे वचन द्यायला आलोय, असं अमित ठाकरे म्हणाले.
दरम्यान, पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित शालेय विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणि मोफत बॅग वाटप कार्यक्रमात मनसे नेते अमित ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला