पुणे : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते लोहगाव येथील पुणे विमानतळाच्या  (Pune Airport) नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे दुरदृष्यप्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले. या नव्या टर्मिनलमुळे देशातील सामान्य माणसासाठी विमान प्रवास अधिक सुलभ आणि सुखकर होईल, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. 4 ते 6 आठवडे सुरक्षा चाचण्या पूर्ण केल्यानंतर नव्या टर्मिनलवरून उड्डाण सुरु करण्यात येणार आहे.


पुणे शहराला साजेसे भव्य आणि आधुनिक, पुणे शहराच्या संस्कृतीची अनुभूती करून देणारे टर्मिनल अस्तित्वात आल्याबद्दल केंद्र सरकारला धन्यवाद देऊन यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,  पुणे हे एक महत्वाचे शहर आहे. पुणे जिल्हा महाराष्ट्राचे मॅन्युफॅक्चरिंग आणि आयटी हब आहे. देश-विदेशातून अनेक नागरिक पुण्यात येतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवाशांना सुविधा देण्यासाठी जुने टर्मिनल अपूरे होते. संरक्षण मंत्रालयाला विनंती करण्यात येऊन नव्या इमारतीसाठी जागा उपलब्ध झाली आणि त्यामुळे भव्य टर्मिनल उभे राहिले आहे.


महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा इमारतीच्या बाहेर उभारण्यात आला आहे. श्री विठ्ठलाचे म्युरल, वारली कला, देशी  खेळ मल्लखांब आदींचे दर्शन या इमारतीत घडते. आपल्या स्थानिक संस्कृतीला साजेसे वातावरण  इमारतीत आहे.  विमानतळावर स्थानिक उत्पादनांची विक्री करता येणार आहे. एक परिपूर्ण टर्मिनल आपल्याला मिळाले आहे. कोल्हापूरलादेखील मराठा साम्राज्याला साजेसे असे टर्मिनल उभे रहात आहे. महाराष्ट्रातही विमानतळाच्या धावपट्यांना विकसीत करून विमानतळांचे जाळे निर्माण करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.


कसे आहे नवीन टर्मिनल?


एकूण क्षेत्रफळ : 52 हजार चौरस मीटर


तासाला प्रवासी क्षमता : 3 हजार


वार्षिक प्रवासी क्षमता : 90 लाख


वाहनतळ क्षमता  : 1 हजार मोटारी


प्रवासी लिफ्ट : 15


सरकते जिने : 8


चेक-इन काऊंटर : 34


एकूण खर्च – 475 कोटी रुपये


व्यस्त वेळेत 3 हजार प्रवासी क्षमता


भारतीय विमानतळांना आधुनिक सुविधा देण्यात येणार आहे. विमानतळावर स्थानिक संस्कृतीला प्रदर्शित करण्यात आलं आहे. पुणे विमानतळाच्या एकात्मिक टर्मिनल इमारतीचे क्षेत्रफळ 52 हजार चौ.मीटर असून सर्वाधिक व्यस्त वेळेत 3 हजार प्रवासी क्षमता आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात विमानसेवा क्षेत्राने मोठी भरारी घेतली आहे. देशात गेल्या दहा वर्षात विमानतळांची संख्या दुप्पट झाली आहे. सामान्य माणसासाठी ‘उडान’ योजनेअंतर्गत हवाई वाहतूक उपलब्ध होत आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Ajit Pawar And Supriya Sule : बहिण- भाऊ पुन्हा एका मंचावर; अजित पवार आणि सुप्रिया सुळेंचा अबोला कायम राहणार?