Pune News : पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात (Fergusson College) शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या (Suicide) केल्याने एकच खळबळ उडाली आहे. बी.एससीच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील वडारवाडी इथल्या विष्णू कुंज वसतिगृहात (Hostel) विद्यार्थ्याने गुरुवारी (27 जुलै) गळफास घेतला. ओम कापडणे (वय 19 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.


विद्यार्थी मूळचा नाशिकमधला


19 वर्षीय ओम कापडणे हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील आहे. तो शिक्षणासाठी पुण्यात आला होता. फर्ग्युसन कॉलेजमध्ये विज्ञान शाखेच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता. तर विष्णू कुंज वसतिगृहात तो राहत होता. याच वसतिगृहात त्याने गुरुवारी (27 जुलै) गळफास घेतला. या घटनेची माहिती मिळताच ओम कापडणेला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु उपचारांपूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी रुग्णालयात तपासून त्याला मृत घोषित केलं.


आत्महत्येचं कारण अस्पष्ट


दरम्यान ओमने आत्महत्या का केली याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. शिवाय वसतिगृहात ज्या खोलीत त्याने गळफास घेतला तिथे कोणतीही चिठ्ठी आढळून आलेली नाही. त्यामुळे ओमने हे पाऊल का उचलले याबाबत सध्या काहीही माहिती मिळू शकलेली नाही. पोलीस सध्या या घटनेमागील कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.


पोलिसांकडून तपास सुरु


गुरुवारी सायंकाळी त्याने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं. या घटनेची नोंद चतु:शृंगी पोलीस ठाण्यात  करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचं चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) अंकुश चिंतामण यांनी सांगितलं.


चार महिन्यांपूर्वी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थाची आत्महत्या


दरम्यान चार महिन्यांपूर्वी पुण्यात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 21 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. पुण्यातील शासकीय बीजे वैद्यकीय महाविद्यालयाच्या 21 वर्षीय विद्यार्थिनीने 29 मार्च 2023 रोजी सकाळी महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयाच्या टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनी काही दिवसांपासून अभ्यास आणि परीक्षेच्या ताणामुळे अस्वस्थ होती. पालकांनी तिला मानसोपचारतज्ज्ञांकडेही नेलं होतं. तिच्याकडून कोणतीही सुसाईड नोट सापडली नसल्याचं त्यांनी सांगितलं. ही विद्यार्थिनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रथम वर्षात शिकत होती आणि तिने ससून जनरल हॉस्पिटलच्या टेरेसवरुन उडी मारली, असं पोलिसांनी सांगितलं.


हेही वाचा


Pune Crime: पुण्यात खळबळ! अमरावती पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या, पत्नी आणि पुतण्याची हत्या करून स्वतःला संपवलं