पुणे: उद्याचे नेतृत्व करणाऱ्या शहरांना सर्वतोपरी स्वयंपूर्ण बनवण्याच्या उद्देशाने विचारमंथन आणि कृती करण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून आजपासून जी-20 परिषदेला सुरुवात झाली. या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते पार पडले. गुंतवणुकीच्या विविध पैलूंवर चर्चा करण्याबरोबरच दर्जेदार पायाभूत सुविधा उभारणे, गुंतवणुकदारांसाठी अशा सुविधांचे पर्याय उपलब्ध करून देणे, त्यासाठी आवश्यक आर्थिक गुंतवणूक आणणे, या उद्देशाने जी 20 सदस्य देश आणि इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप यांमध्ये या परिषदेत चर्चा होणार आहे.
पुण्यातील जे. डब्ल्यू. मॅरियत हॉटेलमध्ये 16 आणि 17 जानेवारीला जी-20 परिषद पार पडत आहे. भारतासह ऑस्ट्रेलिया आणि ब्राझील यांच्यातर्फे या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
यंदाच्या परिषदेची ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ अशी मध्यवर्ती संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. पुणे येथे होत परिषदेत शहरांचा विकास हे सामाईक लक्ष्य असून उद्याच्या आव्हानांसाठी ही शहरे सर्वसमावेशक, लवचिक आणि शाश्वत करणे हा चर्चेचा केंद्रबिंदू ठरणार आहे. शहरांना आर्थिक विकासाची केंद्रे बनवणे, शहरी पायाभूत सुविधांना वित्तपुरवठा करणे, भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज करणे, शहरी पायाभूत सुविधा निर्माण करणे, सामाजिक असंतुलन कमी करणे, अशा विविध पैलूंवर या निमित्ताने काम केले जाणार आहे.
G-20 परिषदेत कोण सहभागी होणार?
भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाचा आर्थिक व्यवहार विभाग या दोन दिवसीय बैठकांचे यजमानपद भूषवेल तर ऑस्ट्रेलिया आणि ब्राझील बैठकांचे सहअध्यक्षपद भूषवत आहेत. पुण्यामधील पहिल्या आयडब्लूजी बैठकीमध्ये जी20 सदस्य देश, निमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे 65 प्रतिनिधी सहभागी होत आहेत.
आंध्र प्रदेश, पंजाब, तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र, छ्तीसगड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांतील महापालिकांचे 300 अधिकारी या परिषदेत सहभागी झाले आहेत. अनेक बैठका, चर्चा, विचारमंथन यांच्याबरोबरच वृक्षारोपण, सहभोजन, पुणे शहराचा हेरिटेज वॉक, महाबळेश्वर या नजिकच्या पर्यटन स्थळाला भेट असा भरगच्च कार्यक्रम आखण्यात आला आहे.
पहिल्या दिवशी काय झालं?
G-20 परिषदेच्या पहिल्या सत्रात भारताच्या अध्यक्षपदाखाली, पायाभूत कार्यगटाची पहिली बैठक झाली. त्यानंतर “उद्याच्या शहरांसाठी वित्तपुरवठा” या विषयावर उच्चस्तरीय कार्यशाळा झाली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्ये जी-20 राष्ट्रांच्या परिषदेच्या निमित्ताने पुण्यात आलेल्या विविध देशांच्या प्रतिनिधींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
दुसऱ्या दिवशी काय होणार?
17 जानेवारी 2023 रोजी, पायाभूत सुविधा कार्यगट चार सत्रांमध्ये चर्चा करेल. त्यानंतर आभारप्रदर्शन होऊन पुण्यातील या दोन दिवसीय बैठकीची सांगता, निरोप समारंभ आणि मेजवानीने होईल. या औपचारिक चर्चेचा एक भाग म्हणजे परदेशी प्रतिनिधींना शहरातील समृद्ध संस्कृती आणि प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन घडवणे हा ही आहे. त्यादृष्टीने, पुणे हेरिटेज वॉक, शहर दर्शन आणि महाबळेश्वरची सहल अशा सहलींची व्यवस्थाही करण्यात आली आहे.