पुणे : राज्यात यंदा पाऊस कमी असला तरी रब्बीच्या क्षेत्रामध्ये वाढ होणार असल्याचा दावा कृषी विभागानं केला आहे. राज्यातील सरासरी 53.97 हेक्टर वर रब्बीचं पीक घेतलं जातं. यंदा त्यात 9% ची वाढ होऊन एकूण 58.76 हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी होणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे (Agriculture Minister Dhananjay Munde) यांनी पुण्यात दिली.
गहू आणि हरबऱ्याचं क्षेत्र सरासरी इतकंच ठेवलं जाणार आहे. तर रब्बी ज्वारी तसेच तेलबियांचं क्षेत्र वाढवण्यात येणार आहे. पिक नियोजनाच्या माध्यमातून पाण्याची उपलब्धता आणि रब्बीचं वाढीव क्षेत्र यांचं योग्य संतुलन साधणार असल्याचा दावा कृषी विभागाकडून करण्यात आलाय. हे सगळं सांगत असताना पाऊस कमी असला तरी शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी भरलेल्या असल्याचा अजब दावाही कृषिमंत्र्यांनी केला आहे.
दरवर्षी पेक्षा काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी कमी पाऊस झाला. दुहेरी परिस्थिती आहे. रब्बीचं क्षेत्र कमी झाल्याचा अंदाज आहे. 1 कोटी 70 लाख शेतकर्यांनी 1 रुपया पीकविमा काढला आहे. त्याचा मोठा फायदा होईल. दोन्ही संकटं असली तर फक्त 1 रुपयात संरक्षण झालेलं आहे. डिसेंबरपर्यंत मुदत आहे. रब्बीच्या पिकाचा लाभ घेतला पाहीजे. यांत्रिकीकरणाच्या बाबतीत ड्राॅ काढावा लागतो. तीन योजना आहेत. यात पैसे यावे लागतात. मार्च नंतर ड्राॕ निघाला नाही याची माहिती घ्यावी लागेल. मागच्या वेळी पेक्षा जास्त बजेट यावेळी ड्राॅसाठी ठेवलं आहे. लाभार्थी पात्रता तपासून यांत्रिकीकरणासाठी पैसे कमी पडू देणार नाही, असंही ते म्हणाले.
आमचं सरकार हे पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असून जर दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली तर बीड जिल्ह्यातील पंचवीस हजार शेतकऱ्यांना चारा उपलब्ध करून देण्यासाठीच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तर पाण्याची कमतरता भासल्यास विहिरीच्या अधिग्रहण करण्याचे आदेश देखील जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. तर आगरीम पिक विम्याच्या संदर्भात अधिसूचित झालेल्या सर्व मंडळाला दिवाळीच्या अगोदर पीक विम्याची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. नमो शेतकरी सन्मान योजना ही अधिक बळकट करण्यासाठी सहा हजार रुपयांचा पहिला हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले आहेत.
उठसूठ दादांवर आरोप हे षडयंत्र
IPS मीरा बोरवणकर यांनी पुस्तकातून अजित पवारांवर आरोप केले आहेत. त्यावर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. टेंडर निघाले तेव्हा अजित पवार फक्त पालकमंत्री होते. तेव्हा तक्रार केली नाही आता रिटायर झाल्यानंतर पुस्तक लिहीलं. तत्कालीन गृहमंत्री यांनी टेंडर रद्द करण्याचा निर्णय घेतला. उठसूठ दादांवर आरोप हे षडयंत्र आहे. जे सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत काम करतात त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे.