Pune Crime News :  शेकोटी पेटवण्यावरून (Pune Crime) झालेल्या किरकोळ वादामधून हवेमध्ये गोळीबार (Firing) करण्यात आल्याची घटना घडली आहे. पुण्यातील वडगाव शेरी जवळील ब्रह्मा सनसिटी या ठिकाणी असलेल्या अर्नोल्ड स्कूल समोर रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. गोळीबारानंतर परिसरात खळबळ उडली होती. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.


नक्की काय घडलं?


येरवडा पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार ब्रह्मा सनसिटीजवळ असलेल्या अर्नोल्ड स्कूलजवळ सागर गायकवाड, अक्षय खामकर, रोहित क्षत्रिय, रोहित जेधिया, सिद्धार्थ शिंदे आदी तरुण शेकोटी करीत बसलेले होते. त्या ठिकाणी अमित सिंह हा गेला. त्यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची सुरू झाली. या वादातून  अमित सिंह याची गाडी फोडण्यात आली. चिडलेल्या अमितने त्याच्याकडील पिस्तुलामधून हवेमध्ये  गोळीबार केला. त्यानंतर या तरुणांनी अमितला बेदम मारहाण करीत गंभीर जखमी केले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  या प्रकरणी दोन्ही बाजूने एकमेकांच्या विरोधात तक्रारी दाखल करण्याचे काम सुरू आहे. 


अमित सिंग यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अमित सिंग यांचा आईस्क्रीमचा ब्रॅंड आहे. त्यांची हडपसरला फॅक्टरी असून त्यांच्या आठ ते नऊ फॅन्चायसी दिलेल्या आहेत. ते कल्याणीनगरमधील सिलीकॉन बे येथे राहतात. सोमवारी रात्री 11 वाजता जेवण करुन ते बाहेर फिरायला गेले होते. तेथील रस्त्याच्या डेड एन्डला एका ठिकाणी काही तरुण शेकोटी करुन शेकत बसले होते. त्यावेळी ही घटना घडली.


किरकोळ वादातून गोळीबाराच्या घटनेत वाढ


किरकोळ वादातून गोळीबाराच्या घटनेत वाढ झाली आहे. रोज नवे गुन्हे आणि किरकोळ वादातून हल्ले करण्यात आल्याच्या घटना सातत्याने समोर येतात. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्याचे मनसे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे (Samir Thigale) यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. राजगुरुनगरच्या सातकरस्थळ येथील राहत्या घरासमोर हा प्रकार घडला होता. या गोळीबारात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मागील अनेक वर्षांपासून समीर थिगळे मनसेत कार्यरत आहेत. कुख्यात गुंडानी हा गोळीबार केला होता. कुटुंबीयांसमोरच गोळीबार केल्याने परिसरात आणि कुटुंबात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.