Pune leopard : पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी बिबट्यांचा वावर बघायला मिळत आहे आता त्यातच बिबट्याने सहा फुटी सुरक्षा भिंतीवरून उडी घेत, पाळीव कुत्र्याची शिकार केली आहे. हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला. 30 एप्रिलच्या मध्यरात्री ही घटना घडली आहे. पुण्याच्या मंचरमधील ही घटना आहे. वनविभाग त्याअनुषंगाने पाहणी करत आहे. मात्र या बिबट्याने थेट सहा फुटी सुरक्षा भिंतीवरून उडी घेत अशी शिकार केल्याने बिबटक्षेत्र परिसरात पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण पसरले आहे.


मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात विविध भागांमध्ये बिबट्यांचा वावर दिसून येत आहे. त्यामुळे अनेक नागरिक धास्तावले आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याचं पाण्याच्या शोधात हे बिबटे वस्तीत शिरत असावेत असा अंदाज आहे. मात्र या बिबट्यांच्या अशा वावरामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. सध्या बिबट्याचा धडकी भरवणारा हा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होत आहे. यात बिबट्याने थेट सहा फुट उंच असलेल्या भिंतीवरुन उडी मारुन घरात शिरताना दिसत आहे आणि थेट कुत्र्यावर हल्ला करुन त्याची शिकार केल्याचं दिसत आहे. 


कुत्रा दिसत नसल्याने सीसीटीव्ही तपासलं अन्...


घरातील कुत्रा दोन दिवस दिसत नव्हता. त्यामुळे कुत्र्याच्या मालकाने सीसीटीव्ही फुटेज तपासले. दोन दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. त्यानंतर गावातील अनेकांच्या मनात धडकी भरली आहे आणि दहशत निर्माण झाली आहे. 


चाकणमध्येही केला बिबट्याची दहशत...


मागील महिन्यात पुण्यातील चाकण एमआयडीसीमध्ये पहाटे बिबट्या आढळला होता. हा बिबट्या मर्सडिज बेन्ज या आंतरराष्ट्रीय कंपनीत घुसल्याचं कंपनीमधील एका चालकाच्या निदर्शनास आलं होतं. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन बिबट्या असल्याची खात्री करून घेतली. तसेच त्यांनी याबाबत वनविभागाला कळवलं होतं. जवळपास सात तासांच्या थरारानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं. कंपनीच्या बॉडी शॉप सेक्शनमधील कामगारांना खबरदारी म्हणून बाहेर काढण्यात आलं होतं. चाकण एमआयडीसीत अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या असल्याने, या एमआयडीसीची आंतरराष्ट्रीय पातळीवर एक वेगळी ओळख आहे. याच एमआयडीसीमधील मर्सडिज बेन्ज या आंतरराष्ट्रीय कंपनीत आज बिबट्याने शिरकाव केला होता. यामुळं एमआयडीसीसह आसपासच्या परिसरात खळबळ उडाली होती. कंपनी साधारण शंभर एकरमध्ये विस्तारल्यानं बिबट्याला जेरबंद करण्याचं मोठं आव्हान वनविभागासमोर होतं. मदतीला पिंपरी चिंचवड पोलीस ही दाखल झाले होते.


पाहा व्हिडीओ :