Pune News : जयवंत पब्लिक स्कूलमध्ये  चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या अवघ्या 9 वर्षाच्या प्रणव प्रविण गुंड याने एक नवा विश्वविक्रम केला आहे. त्याची नोंद 'इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नुकतीच झाली आहे. प्रणव याने महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांची नावे 39 सेकंदात बोलत हा विक्रम केला आहे. अशा प्रकारचा विश्वविक्रम होण्याची ही पहिलीच वेळ आहे. प्रणवच्या नावाने ह्या विश्वविक्रमाची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये अधिकृत नोंद झाली आहे.


प्रणव गुंड हडपसरमधील ड्रीम्स आकृती सोसायटीमध्ये राहतो. त्याचे आई-वडील दोघेही डॉक्टर आहेत. आई डॉ. मीनाक्षी गुंड आयुर्वेद चिकित्सक आहे आणि वडील डॉ. प्रविण गुंड हे पुण्यातील रसायु कॅन्सर क्लिनिकमध्ये कार्यरत आहेत. मुलाने केलेल्या कामगिरीमुळे आई वडील समाधानी आहेत आणि भावी आयुष्यात त्याला प्रोत्साहन देण्याच्या संकल्प त्यांनी दिला आहे. त्याने केलेल्या या रेकॉर्डमुळे नातेवाईकांकडून त्याचं कौतुक केलं जात आहे. 


प्रणवच्या आई वडिलांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, प्रणव लहानपणापासून हुशार आहे. तो पटकन गोष्टी आत्मसात करतो. प्रणव चार वर्षाचा असताना तो विविध शहर, राज्य यांची नावे घेत असे व ती वारंवार बोलण्याचा प्रयत्न करत असे. त्याच्यामधील स्मृती व सातत्य लक्षात घेऊन त्याला प्रोत्साहन दिले. नुकतेच त्याने स्केटिंगमध्ये जिल्हा स्तरावर गोल्ड मेडल मिळवले आहे. क्यूब सोडविण्यातही त्याला रस असून, तो त्याचा नियमित अभ्यास करत आहे.


प्रणवच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तो शिकत असलेल्या शाळेच्या शिक्षकांनीदेखील त्याचं फोन करून विशेष अभिनंदन केलं. त्याच्या समवयस्क मुलासाठी ती एक प्रेरणा स्त्रोत बनला आहे. त्याने केलेला विश्वविक्रम याचा व्हिडीओ इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड यांच्या यूट्यब चॅनलवर अपलोड झाला आहे. तसेच इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड यांच्या अधिकृत सर्व प्लॅटफॉर्म वर हा विश्वविक्रम प्रकाशित झाला आहे. प्रणव इथे न थांबता नवनवीन गोष्टी आत्मसात करून पुढे जाण्याच्या तयारीत आहे व ते नक्की करेन, असे विश्वासाने प्रणवने सांगितले.


सगळीकडेच कौतुक...


प्रणव हा 9 वर्षांचा आहे. एवढ्या लहान वयात त्याने मोठं यश प्राप्त केलं आहे. खेळण्या बागडण्याच्या वयात त्याने अभ्यास करुन जिल्ह्यांची नावं पाठ केली आणि ती बोलून दाखवली. एरवी या वयातील मुलांना नवीन गोष्टी शिकवणं कठिण जातं मात्र त्याच्या पालकांनी या गोष्टी केल्यात आणि त्यामुळे त्याचं आणि त्यांच्या पालकांचं सगळीकडे कौतुक केलं जात आहे.