केडगाव, पुणे : वीजबिलाच्या थकबाकीसाठी (Electricity) बंद केलेल्या मीटरला बायपास करुन उच्चदाबाच्या रोहित्राला थेट मोठी केबल जोडून वीजचोरी करणाऱ्या चोराचा महावितरण केडगाव विभागाने ड्रोनच्या सहाय्याने छडा लावला आहे. मुकेश अगरवाल असे या वीजचोराचे नाव असून त्यास महावितरणने 2 कोटी 4 लाखांचा दंड ठोठावला आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


सणसवाडी येथे श्री. मुकेश ओमप्रकाश अगरवाल (रा. अग्रसेन सोसायटी, कोरेगाव पार्क, पुणे) यांच्या मालकीच्या तीन वेगवेगळ्या कंपन्या आहेत. पैकी मे. थर्मोलाईट पॅकेजिंग इंडिया प्रा.लि व मे. प्रकाश करुगेटेडे पुणे प्रा.लि ह्या दोन उच्चदाबाचे तर मे. भगवान ट्यूब प्रा.लि. हे लघुदाब ग्राहक आहेत. तिन्ही कंपन्या एकाच आवारात व शेजारी-शेजारी आहेत. यामध्ये प्रामुख्याने थर्माकोल आणि पुठ्ठा बनविण्याचे काम होते. मे. थर्मोलाईट पॅकेजिंग इंडिया प्रा.लि या ग्राहक जोडणीचा वीजपुरवठा थकबाकीमुळे कायमस्वरूपी बंद केला होता तर इतर दोन वीजजोडण्यांचा वीजपुरवठा देखील थकबाकीच्या कारणास्तव तात्पुरता बंदच आहे. 


महावितरणने वीजपुरवठा बंद केलेला असतानाही वीजपुरवठ्यासाठी उभारण्यात आलेला अतिउच्चदाब रोहित्रातून थेट वीजपुरवठा सुरू केल्याची माहिती केडगावचे कार्यकारी अभियंता संदीप दरवडे यांना खबऱ्यामार्फत मिळाली. ही वीजचोरी मोठी असल्याने आणि संबंधित ग्राहकाने गेटवर बंदोबस्त लावून आत जाण्यास मज्जाव केल्याने दरवडे यांनी ही बाब मुख्य अभियंता सुनिल पावडे यांच्या कानावर घातली. तेव्हा मुख्य अभियंता पावडे यांनी वीजचोरी उघडकीस आणण्यासाठी ड्रोनची मदत घेण्यास सांगितले. 25 ऑगस्टला संदीप दरवडे आठ जणांच्या पथकासह गेले. कुरिअर पार्सल देण्याच्या निमित्ताने एका दुचाकीवरुन त्यांनी एका मित्राच्यासह आत प्रवेश मिळवला. पुराव्यासाठी ड्रोनद्वारे चित्रिकरण सुरु केले आणि तोच बाहेर दबा धरुन बसलेल्या टीमने ओळखपत्र दाखवून आत प्रवेश केला आणि वीजचोरीचा पर्दाफाश केला. कार्यकारी अभियंता दरवडे यांच्या फिर्यादीवरुन भारतीय विद्युत अधिनियम 2003 कलम 135 आणि 138 नुसार शिक्रापूर पोलीस ठाण्यात वीजचोरीचा आणि वीज यंत्रणेस छेडछाड केल्याचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे. 


वीजचोरीमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले


मुख्य अभियंता सुनिल पावडे, अधीक्षक अभियंता म्हसू मिसाळ यांचे मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता संदीप दरवडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता किशोर शिंदे, उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन, सहा. अभियंता गौरी काळंगे व बाळासाहेब टेंगले, कनिष्ठ अभियंता श्रीकांत ताटीकोंडा, जनमित्र विश्वनाथ किंदरे आणि ज्ञानेश्वर आहिरकर यांनी ही कामगिरी यशस्वी केली. महावितरणने पकडलेल्या या वीजचोरीमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत.