Pune Crime News : शॉर्ट कपडे घातल्यामुळे तरुणींना मारहाण केल्याची संतापजनाक घटना पुण्यात घडली आहे. याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण झालेल्या दोन्ही मुली आयटी इंजिनिअर आहेत. मारहाण करण्यात आलेल्या दोन्ही युवती परराज्यातील आहेत.
पेईंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या आयटी इंजिनीअर तरुणी शॉर्ट ड्रेस घालून फिरत असल्याच्या कारणावरून शेजारी राहणाऱ्या महिलेने चपलेने मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रक्षकनगरमध्ये बुधवारी ही घटना घडली. याप्रकरणी एका 32 वर्षीय महिलेने फिर्याद दिली होती. फिर्यादीनंतर एकाच कुटुंबातील सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे. अलका किसन पठारे, शीतल कमलेश पठारे, सीमा बाळासाहेब पठारे, सचिन किसन पठारे, केतन बाळासाहेब पठारे, किरण सचिन पठारे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
ज्योती संजय येळे यांनी तरुणींना मारहाण झाल्याची फिर्याद चंदननगर पोलीस ठाण्यात दिली होती. ज्योती येळे यांची लेक्सीस सोसायटीत सदनिका आहे. आयटी कंपनीत काम करणाऱ्या तीन तरुणी येळे यांच्याकडे भाडे तत्त्वावर राहायला आहेत. या तरुणींनी शॉर्ट कपडे घातले म्हणून त्यांना मारहाण झाली होती. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेले सर्व आरोपी याच सोसायटीत राहायला आहेत.
मुली शॉर्ट ड्रेस घालून सोसायटीच्या आवारात ये-जा करत होत्या. त्यामुळे चिडून जाऊन आरोपींनी तरुणी राहत असलेल्या घरात जाऊन सर्व आरोपींनी मारहाण केली. त्यांनी युवतींना शिवीगाळ आणि मारहाणही केली तसेच धमकावलेही, असे येळे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.