Pune NCP Protest : पुण्यात पाच तासांच्या पावसाने अनेक ठिकाणी पाणी तुंबलं होतं. अनेक परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांंचं काम सुरु आहे. त्या कामासाठी खड्डे खोदले आहे. पावसामुळे याच खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. पुणे तुंबण्याला महापालिका जबाबदार आहे, असा आरोप पुण्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने केला आहे. त्यांनी या सगळ्याला विरोध करत आज अनोखं आंदोलन केलं आहे. शहरात विविध ठिकाणी पाणी तुंबल्याने बोट दाखवेन तिथे बोट सेवा सुरु करा, असं म्हणत भरपावसात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खरीखुरी बोट रस्त्यावर आणत हे आंदोलन केलं. पुणे महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आलं.
यावर्षीच्या पावसाळ्यात अगोदरच खड्डेमय असणारे पुणे शहर आता जलमय झालं आहे. पावसामुळे जागोजागी खोदून ठेवलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साठले. अनेक ठिकाणी दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी साचले. लोकांच्या घरांमध्ये पाणी गेलं. ड्रेनेज लाईन तुटलेल्या आहेत. अनेक ठिकाणी तर रस्त्यांना ओढ्याचे स्वरुप झाले होते. एकंदरीत पुणेकरांची कालच्या पावसाने दाणादाण उडविली आहे. त्यामुळे हे अनोखं आंदोलन करण्यात आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: पुणे शहर स्मार्ट करण्याची घोषणा केली होती. परंतु पुण्यात सत्तेत असलेल्या भाजपने मात्र पुणे आणि पुणेकरांची दुर्दशा केली आहे. गेली पाच वर्षे मनपातील कारभार तर देशाच्या पंतप्रधांनानी दिलेल्या वचनाला हरताळ फासणारा होता. पुणेकरांची स्मार्ट सिटी भाजपाने पाण्यात बुडवली. तसेच देशाच्या पंतप्रधानांचा शब्द खोटा ठरविल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
पुणेकरांनी भाजपवर विश्वास ठेवत भाजपला प्रचंड बहूमत दिलं. भाजपचे 99 नगरसेवक निवडून आणले. मात्र यांना पुणेकरांच्या भल्याचं देणंघेणं नाही आहे. कामाच्या टेंडरची मलाई खाण्यात भाजपला रस आहे. दोन दिवसांपुर्वी झालेल्या पावसाने पुण्याची दैना केली अनेक कुटुंब रस्त्यावर आली. त्यामुळे भाजपला लाज वाटली पाहिजे, पुणेकरांची सेवा करण्याकडे त्यांचं दुर्लक्ष आहे, असा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.
चार तासांच्या पावसात पाणी तुबतं आणि रस्ते बंद पडतात त्यामुळे काही दिवसांनी पुण्यात दुचाकी चारचाकी चालवण्याची सोय नसणार आहे. त्यासाठीची तयारी राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. बोट दाखवेन तिथे बस नाही तर बोट दाखनेन तिथे बोट अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. पुणेकरांच्या पैशाचा विपर्यास केला जात आहे. हा विपर्यास खपवून घेणार नाही. त्यामुळे भाजपने लाज बाळगून जनतेला न्याय दिला पाहिजे, असं मत राष्ट्रवादीने व्यक्त केलं आहे.