पुणे : शहरातील नवले (Pune) पुलावर झालेल्या भीषण अपघातात (Accident) 9 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी असल्याची माहिती आहे. अपघातानंतर स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने तो ट्रक इतर वाहनांना घेऊन एका कंटनेवर जाऊन आदळला. त्यामुळे, घटनास्थळी कारमधील सीएनजीचा स्फोट होऊन आग लागल्याची भीषण दुर्घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ पाहिल्यानंतर अपघाताची दाहकता लक्षात येते. पोलीस व अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य केले. दरम्यान, या दुर्घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी शोक व्यक्त केला आहे. तर, आमदार रोहित पवार यांनी शासनाने येथील पुलासंदर्भाने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
पुण्यातील अपघाताच्या घटनेवर नेतेमंडळींकडून शोक व्यक्त केला जात आहे. पुण्यातील नवले पुलाजवळ दोन कंटेनरची झालेली धडक आणि त्यामध्ये एका कारचा झालेला भीषण अपघात तसेच त्यानंतर लागलेली आग ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची बातमी अतिशय वेदनादायी असून मी मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे म्हणत अजित पवार यांनी शोक व्यक्त केला आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांप्रती सहसंवेदना व्यक्त करतो, तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थनाही अजित पवार यांनी केली आहे. यासह आमदार रोहित पवार यांनीही ट्विट करत शासनाने या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त केली आहे.
पुण्यातील नवले पुलावर झालेल्या अपघातात काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. या घटनेत प्राण गमावलेल्या व्यक्तींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, असे ट्विट करत मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच, या अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन दिली.
नवले पूल हा ब्लॅक स्पॉट (Pune navele bridge accident)
पुण्यातला नवले पूल हे ठिकाण ब्लॅक स्पॉट बनलं असून इथं आतापर्यंत झालेल्या विविध अपघातात अनेक जणांचे बळी गेले आहेत. आजही झालेल्या विचित्र अपघात 9 हून अधिक जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नवले पुलावर होणारी वाहतूक कोंडी आणि अवजड वाहनांची वाहतूक अत्यंत धोकादायक बनली आहे. इथं वारंवार अपघात होऊनही प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात नाहीत. शासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असे ट्विट आमदार रोहित पवार यांनी केले आहे.
हेही वाचा
पुण्यातील नवले ब्रीज अपघात नेमका कसा घडला, 7 जणांचा मृत्यू; पोलीस अधिकाऱ्याने दिली माहिती