Pune Accident : पुण्यात (Pune) अपघातांची मालिका कायम आहे. पुणे-बंगळुरु महामार्गावरील नवले पुलाजवळ (Navale Bridge Accident) काल रात्रभरात आणखी दोन अपघात झाले. या दोन अपघातात सहा जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला. नवले ब्रिजवरील भीषण अपघातानंतर स्वामी नारायण मंदिराजवळ दुसरा भीषण अपघात झाला. या अपघातात टेम्पोने सात वाहनांना उडवलं. तर कात्रज रस्त्यावर तिसरा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. नवले पुलाजवळ रात्रभरात एकूण तीन अपघात झाले.
टेम्पोने सात वाहनांना उडवलं
स्वामी नारायण मंदिराजवळ आणखी एक अपघात झाला. टेम्पोने सात वाहनांना उडवलं. अपघातात वाहनांचं मोठं नुकसान झालं. एका गाडीचा चक्काचूर झाला. या कारमधील सहा जण जखमी झाले. तर दैव बलवत्तर म्हणून चालक या अपघातात सुदैवाने बचावला. तर तिसऱ्या अपघातात दुचाकीस्वाराचा दुर्दैवाने मृत्यू झाला.
नवले ब्रिजवर भीषण कंटनेरची वाहनांना धडक
नवले पुलावर काल (20 नोव्हेंबर) रात्रीच्या सुमारास नर्हे नजीकच्या परिसरात भीषण अपघात झाला. कंटेनरने धडक दिल्यामुळे 24 गाड्यांचे नुकसान झाल्याची माहिती पीएमआरडीए अग्निशमन दलाने दिली. आंध्र प्रदेशाचा हा कंटेनर साताऱ्याहून मुंबईकडे जात होता. या ठिकाणी तीव्र उतार आहे. त्यामुळे रात्री वाहतूक संथ गतीने सुरु होती. वेगाने आलेल्या कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटले. त्याने एका पाठोपाठ पुढे असलेल्या गाड्यांना धडक देण्यास सुरुवात केलीयअपघातामुळे रस्त्यावर तेल पसरलं. परिणामी रस्ता घसरडा झाला. त्यामुळे अपघातग्रस्त वाहनांची संख्या वाढली. दरम्यान या अपघातात जीवितहानी झालेली नाही, मात्र अनेक जण जखमी झाल्याचं समोर आलं आहे. अपघातामुळे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला होता. साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर सुमारे दोन ते तीन किमी लांबीच्या रांगा लागल्या होत्या. परिणामी मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
नवले पूल अपघाताचं केंद्र
पुण्यातील नवले पुल हा अपघातांचं केंद्र बनला असून अनेक निष्पापांना प्राण गमवावे लागले आहेत. कारण आहे या ठिकाणी चुकलेली रस्त्याची रचना. तीव्र उतार आणि वळणे एकत्र झाल्याने पुण्यातील नवले पुलाचा भाग अपघातांचा हॉटस्पॉट बनला आहे. सतत होणाऱ्या या अपघातांकडे महामार्ग प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने करण्यात आली आहेत. होमहवन, प्रेतयात्रा अशी प्रतिकात्मक आंदोलने देखील करण्यात आली आहेत. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाल्याचे दिसत नसून अपघातांचे सत्र सुरुच आहे. त्यामुळे रस्त्याची रचना बदलावी अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे.
संबंधित बातमी
Pune Accident: पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात, अनेक वाहनं एकमेकांवर आदळली, मुख्यमंत्र्यांकडून दखल