Pune Accident : पुण्यात (Pune) अपघातांचं सत्र संपायचं नाव घेत नाही आहे. या प्रत्येक अपघातानंतर बचावकार्याचं मोठं आव्हान असतं. कालच्या अपघातात पीएमआरडीए अग्निशमन दल आणि हेल्प रायडर्सने यात महत्वाची कामगिरी बजावली. या बचावकार्यात एका दाम्पत्याचाही समावेश होता. अपघाताची माहिती मिळाताच हेल्प रायडर्स संघटनेत काम करत असलेलं एक दाम्पत्य घडनास्थळी दाखल झालं. 'वाहतूक कोंडीमुळे त्यांना घटनास्थळी पोहोचायला थोडा उशीर झाला होता. मात्र वाहतूक सुरळीत करण्यासाठी दोघांनी एकत्र या बचावकार्यात सहभाग घेतला होता. घटनास्थळी पोहोचायला उशीर झाल्याने आपण फार काही करु शकलो नाही, अशी हळहळ या दाम्पत्याने एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली आहे. बाळासाहेब ढमाले आणि श्रुती ढमाले असं दाम्पत्याचं नाव आहे. 


आम्हाला अपघातास्थळी पोहोचायला थोडा उशीर झाला होता. अपघाताची तीव्रता प्रचंड होती. वाहनांचं नुकसान प्रचंड प्रमाणात झालं होतं. अनेकांना रुग्णालयात दाखल करण्याची तयारी सुरु होती. त्यात अनेक महिला देखील होत्या. सगळ्यांकडून बचावकार्य सुरु होतं. मात्र यात बघ्यांची आणि व्हिडीओ काढणाऱ्यांची संख्या जास्त होती. मी आणि माझे पती आम्ही दोघांनी मिळून अशा बचावकार्यासाठी कायम तत्पर असतो. आम्ही अनेक वर्षांपासून बचावकार्यासाठी मदत करतो मात्र कालसारखा अपघात यापूर्वी कधीही पाहिला नव्हता. सुदैवाने या अपघातात कोणाचाही मृत्यू झाला नाही मात्र बघ्यांची गर्दी पाहता बचावकार्य करण्यासाठी असलेले कमी आणि व्हिडीओ काढण्यासाठी असलेले नागरिक जास्त होते, अशी खंत श्रुती ढमाले यांनी व्यक्त केली आहे. 


या मार्गावर आजपर्यंत अनेक अपघात झाले आहेत. त्यात आतापर्यंत किमान 60 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या मार्गावर मोठ्या कन्टेनरची ये-जा असते. त्यामुळे कन्टेनर चालकांनी आपल्या वाहनाची योग्यवेळी दुरुस्ती आणि तपासणी करणं गरजेचं आहे. ब्रेकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. मात्र कन्टेनरचा ब्रेक नीट आहे की नाही याची खात्री प्रत्येक चालकांनी करायला हवी. त्यामुळे अनेक अपघात टळू शकतात, असं हेल्परायडर्स संघटनेच्या बाळासाहेब ढमाले यांनी सांगितलं. 


अपघाताची रात्र
पुण्यात (Pune) अपघातांचं सत्र संपायचं नाव घेत नाही आहे. एकाच रात्री नवले पूल ते कात्रजचा नवीन बोगदा या मार्गावर सलग दोन अपघात घडले. या दोन अपघातात सहा जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला. रात्री दहाच्या सुमारास झालेला अपघात भीषण होता. भरधाव कन्टेनरने धडक दिल्यामुळे 24 गाड्यांचे नुकसान झाल्याची माहिती पीएमआरडीए अग्निशमन दलाने दिली. आंध्र प्रदेशाचा हा कंटेनर साताऱ्याहून मुंबईकडे जात होता. या ठिकाणी तीव्र उतार आहे. त्यामुळे रात्री वाहतूक संथ गतीने सुरु होती. वेगाने आलेल्या कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटले. त्याने एका पाठोपाठ पुढे असलेल्या गाड्यांना धडक देण्यास सुरुवात केली. अपघातामुळे रस्त्यावर तेल पसरलं. परिणामी रस्ता घसरडा झाला. त्यामुळे अपघातग्रस्त वाहनांची संख्या वाढली. दरम्यान या अपघातात जीवितहानी झालेली नाही मात्र अनेक जण जखमी झाले आहेत.