सिंहगड रोड परिसरात दोन दिवसांपूर्वी राधाकृष्ण सोसायटीमध्ये 29 वर्षीय तेजसा श्यामराव पायाळ नावाच्या तरुणीचा मृतदेह सापडला होता. मूळची बीडची असलेल्या तेजसाने एमबीएचं शिक्षण घेतलं होतं. ती हिंजवडी इथल्या एका कंपनीत कामाला होती. काही दिवसांपूर्वी ती आई वडिलांसोबत गावाला गेली होती. चार-पाच दिवसांपूर्वी ती पुण्यात परतली. मात्र त्यानंतर तेजसाचा फोन लागत नव्हता. तिची आई परतली असता तिला घरात मृतदेह आढळला.
तेजसाचा मृत्यू झाला त्या दिवशी पार्टी केल्यानंतर हे दोन्ही तरुण घराला बाहेरून कुलूप लावून गेले होते. पोलिसांना तिथे मद्याच्या बाटल्या, हुक्का आदी सामग्री सापडली होती. मात्र शवविच्छेदनाच्या अहवालानंतर खुनाचा गुन्हा नोंदवला असला तरी तिचा खून झाला आहे की आत्महत्या या निष्कर्षावर पोलिस अद्याप पोहोचले नाहीत.
सिंहगड पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम 302 (हत्या) आणि 201 (पुरावे नष्ट करणे) अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील चौकशी सुरु असून तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या घटनाक्रमाचा मागोवा घेण्यावर काम करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं.