पुणे : महापालिकेच्या प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचे अजून एक उदाहरण समोर आलंय. अनेक नवनवे घोटाळे करण्यासाठी ओळखली जाणारी पुणे महापालिका आता चक्क न केलेल्या कामांसाठी एक कोटी रुपये वाटायला निघाली होती. आरोग्य विभागाच्या एका न झालेल्या कामाचे एक कोटी रुपयांचे बिल अदा करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. 


नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानभूमी, हडपसर येथील अमरधाम, कोथरूड आणि बाणेर येथील स्मशानभूमीमधील विद्युत विषयक कामांचे एकूण एक कोटींच्या रक्कमेचे बिल अदा करण्याची सगळी प्रक्रिया पूर्ण होऊन बिल अदा करण्यात यावे असा शेरा विभागाकडून देण्यात आलेला होता. मात्र ज्या आरोग्य विभागाचे हे काम होतं त्यांना याची कुठलीच कल्पना नव्हती. जेव्हा या कामांची विचारणा त्यांच्याकडे झाली तेव्हा असं कुठलंही कंत्राट दिलेलेच नसल्याचा खुलासा झाला अन् आता प्रकरणी पुणे महापालिकेने ठेकेदाराविरोधात शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलीस त्याचा तपास करत आहेत.


कोविडच्या काळात कुठलीही निविदा नसताना आशय इंजिनिअरींग व असोसिएटस यांनी पालिकेकडे चार स्मशानभूमीच्या विद्युत कामांसाठीचे एक कोटी रुपयांचे बिल सादर केल. विद्युत विभागात या बिलाची फाईल इनवर्ड झाल्यानंतर ते कनिष्ठ अभियंता, कार्यकारी अभियंता व मुख्य अभियंता असा प्रवास करून लेखा परिक्षण (ऑडिट) विभागाकडे पोहचले. त्यात जानेवारी महिन्यांत ही कामे केल्याचे दाखवून त्या संबधीची सर्व मंजुरीची हुबेहुब कागदपत्रे या फाईलमध्ये जोडण्यात आली होती. मात्र, ऑडिटच्या तपासणीमध्ये बिलाच्या फाईलमधील् निविदा क्रमांक व प्रत्यक्ष बिलामध्ये टाकण्यात आलेल्या निविदेचा क्रमांक वेगवेगळे असल्याचे आढळून आले आणि हा सगळा गैरव्यवहार उघड झाला.


या फाईलची बारकाईने तपासणी करण्यात आली असून त्यावर आरोग्य विभागाकडून माहिती मागविण्यात आली. त्यात अशा पध्दतीच्या कामांसाठी कोणत्याही प्रकारच्या निविदाही काढण्यात आल्या नव्हत्या आणि त्यासंबधीचे आदेशही दिले गेले नव्हते असे सांगण्यात आले. त्यामुळे ही एक कोटींचे बोगस बिले असल्याचे स्पष्ट असल्याचं महापालिका अधिकाऱ्याने सांगितलंय.
    
अनावधाने हा प्रकार समोर आला. मात्र अशा प्रकारची किती बोगस बिले निघाली असतील असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. महापालिका आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कनिष्ठ अभियंता त्यांपासून वरिष्ठ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे आणि संबंधित ठेकेदारावर फसवणुकीचा गुन्हा शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलाय. मात्र सामान्य पुणेकरांच्या कराचा पैसा महापालिका आशा प्रकारे उडवत असेल तर महापालिका विकास कोणाचा करतेय असा प्रश्न पुणेकरांना पडलाय. 


संबंधित बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha