बारामती : मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही भूमिका आमची आहे, पण आमचं म्हणणं आहे की आरक्षण मिळालं त्यांना त्रास होणार नाही, अशी भूमिका असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज बारामतीमध्ये मांडली. बारामतीमध्ये आज जनसमान रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीमध्ये बोलताना छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर जोरदार तोफ डागताना गंभीर आरोप केले. मात्र, त्यांचे भाषण पूर्ण होताच 'एक मराठा लाख मराठा'च्या जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भुजबळ यांनी आपल्या भाषणातून मराठा समाजाचा मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करताना शरद पवार यांच्यावरती जोरदार टीका केली. भाषण पूर्ण होताच झाल्यानंतर 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणा देण्यात आल्या. 


बारामतीमधून एक फोन आला आणि...


भुजबळ पुढे म्हणाले काही लोकांचा विचार आहे की आपापसात दंगली झाल्या पाहिजेत. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे आमची भूमिका आहे, पण मात्र ज्यांना आरक्षण मिळालं आहे त्रास होणार नाही हे पाहिलं पाहिजे. छगन भुजबळ म्हणाले आरक्षणासाठी सह्याद्रीवर सर्वपक्षीय बैठक बोलावली. मी विजय वडेट्टीवार यांना सांगितलं होतं तुम्ही सुद्धा या. बैठकीला येण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांना सुद्धा बोललो होतो आणि त्यांना सांगितलं होतं की शरद पवार यांना सुद्धा बोलवा. ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवार यांनी बैठकीला यायला हवं होतं. मात्र, संध्याकाळी बारामतीमधून एक फोन आला आणि सगळ्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकल्याचा गंभीर आरोप छगन भुजबळ यांनी केला. 


महाराष्ट्र पेटवण्यासाठी उद्योग सुरू आहेत


ते म्हणाले की तुमचा राग अजितदादा भुजबळ यांच्यावर असेल. मात्र हे मिटवण्यासाठी तुम्ही का येत नाही? महाराष्ट्र पेटवण्यासाठी उद्योग सुरू आहेत. निवडणुकीवेळी तुमचे झेंडे घ्या, आम्ही आमचे घेऊ, पण अशा मुद्द्यांवर बहिष्कार टाकून समाजाला वाऱ्यावर सोडणं बरोबर नसल्याचा गंभीर आरोप सुद्धा भुजबळ यांनी केला. 


एक लाख कोटी रुपये समाजातील विविध लोकांना दिले जाणार 


भुजबळ म्हणाले की, अजितदादांचे वैशिष्ट्य आहे की एक लाख कोटी रुपये समाजातील विविध लोकांना दिले जाणार आहेत. याची जबाबदारी आम्ही अजितदादांच्या खांद्यावर टाकली आहे. ज्यांनी सुनेत्रा ताई यांना मतदान केले त्यांनी सुद्धा अर्ज भरा, ज्यांनी सुप्रिया ताईंना मतदान केलं त्यांनी सुद्धा अर्ज भरा. 


इतर महत्वाच्या बातम्या