पुणे : बारामतीतील यवत रेल्वे स्थानकावर दोन्ही फलाटांवर (Yavat Railway Station) मालगाड्या उभ्या असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागता. शिवाय दोन्ही फलाटांवर मालगाड्या उभ्या असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन रुळ ओलांडावा लागल्याचा प्रकार समोर आला. या प्रकारामुळे अनेकांना विनाकारण त्रास सहन करावा लागला. त्यानंतर अधिकाऱ्यांनीदेखील उडवा उडवीची उत्तर दिल्याचंही समोर आलं आहे. बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी व्हिडीओ ट्विट केला आहे. 


सुप्रिया सुळेंनी ट्विटमध्ये नेमकं काय लिहिलंय?


सुप्रिया सुळेंनी ट्विटमध्ये लिहिलंय की, बारामती लोकसभा मतदारसंघातील यवत रेल्वे स्थानकाच्या दोन्ही फलाटांवर मालगाड्या उभ्या असल्यामुळे प्रवाशांना अक्षरशः जीवावर उदार होत रुळ ओलांडून फलाटावर यावे लागले. हा प्रसंग रात्री घडला, त्यामुळे महिला, वृद्ध आणि लहान मुले मालगाडीला वळसा घालून येईपर्यंत मेटाकुटीला आली होती. रेल्वे ड्राईव्हरची ड्युटी संपली म्हणून तो फलाटावरच गाडी लावून गेला असे बेजबाबदार उत्तर रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. रेल्वेच्या प्रवाशांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी रेल्वे प्रशासनाची आहे. परंतु तरीही अशा पद्धतीच्या घटना घडणे हे चुकीचे आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनीजी वैष्णव यांना विनंती आहे की, या प्रकरणाची चौकशी करुन अशा प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नये याबाबतच्या सुचना संबंधितांना द्याव्या, असंही त्या म्हणाल्या आहेत. 


सध्या खासदार सुप्रिया सुळे बारामती लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोमात तयारीला लागल्या आहेत. त्यातच त्या अनेक ठिकाणी भेटीदेखील देत आहे. मागील अनेक वर्षांपासून बारामतीतील विविध प्रश्नांसंबंधात त्या ट्विट करत प्रश्न उपस्थित करत असतात. मतदारसंघात कोणत्याही परिसरात त्यांना कोणताही चुकीचा प्रकार दिसला की त्या थेट ट्विट करुन संबंधित मंत्र्यांना सुचना देतात किंवा मदत मागत असतात. आतापर्यंत अनेकदा त्यांनी असे व्हिडीओ फोटो ट्विट केले आहेत. त्यानंतर त्या समस्यांचं निराकरणदेखील करण्यात आलं आहे. आतापर्यंत पुण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी त्यांनी अनेकदा असे फोटो व्हिडीओ पोस्ट केले आहेत. त्यावर अनेकदा तोडगादेखील काढण्यात आला आहे. शिवाय नवले पुलाची प्रत्येक अपघातानंतर पाहणी करुन या पुलावरील बॅक स्पॉट त्यांनी शोधून काढून त्यावर योग्य तो तोगडा काढण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. नागरिकांच्या समस्यांकडे त्याचं बारकाईने लक्ष असतं, हे यातून समोर आलं आहे. 






इतर महत्वाची बातमी-


-Pune Weather Update : पुणेकरांना उन्हापासून दिलासा; पुण्यात 13 अंश सेल्सिअस तापमान; गारठा वाढण्याची शक्यता


-Pune News : 24 तास उलटले तरी बिबट्या सापडेना; कात्रजमधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, प्राणीसंग्रहालय आजही बंद