Girish Bapat : पुण्यातील भाजपा खासदार गिरीश बापट यांच्याबद्दल आज दिवसभरात अनेक मेसेज व्हायरल झाले होते. त्यांचा मुलगा गौरव बापट यांनी त्यांच्या तब्येतीबद्दल माहिती दिली आहे. गिरीश बापट यांची तब्येत व्यवस्थित आहे, त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरु आहेत, अशी माहिती गौरव बापट यांनी दिली आहे.  कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही त्यांनी केलेय. 


गेल्या काही दिवसांपासून गिरीश बापट यांची प्रकृती खालावली आहे. त्यातच नुकतीच त्यांनी कसबा पेठ येथे प्रचारासाठी हजेरी लावली होती. नाकात नळी, थरथरते हात अन् व्हिलचेअरवर कसब्याचे किंगमेकर गिरीश बापटांची केसरी वाड्यात दमदार एन्ट्री करत पक्षनिष्ठा दाखवून दिली. तेव्हापासूनच त्यांच्याबद्दल अफवा पसरण्यास सुरुवात झाली होती. पण त्यांचा मुलगा गौरव बापट यांनी या अफवा फेटाळून लावल्या आहेत. त्यांची प्रकृती उत्तम असल्याचं सांगितलं.  


पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची तब्येत व्यवस्थित असून त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरु आहेत. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन गिरीश बापट यांचा मुलगा गौरव बापट याने केलंय.  शनिवारी रात्री केंद्रीय गृह मंत्री अमित शहांनी खासदार गिरीश बापट यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. 


बाबांची तब्येतीची चौकशी करायला आज अमित शहा येऊन गेले. दिल्लीतील सदन येथील गमतीजमती आणि काही जुन्या गोष्टींच्या गप्पा झाल्या. त्यांनी तब्येतीची देखील चौकशी केली आणि शुभेच्छा देऊन निघाले. कसबा संदर्भात कुठली ही चर्चा झाली नाही त्यासाठी इतर लोकं आहेतच. माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की बाबांची तब्येत अतिशय उत्तम आहे. कोणीही अफांवावर विश्वास ठेऊ नका. आठवड्यातील एकदा किंवा दोनदा डॉक्टर सांगतीलं तसं डायलिसिस करायला जावं लागतं. कुठल्या ही बातम्या करायच्या आधी मला किंवा आमच्या घरच्यांना विचारले तर सोयीचे होईल. डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं आहे, असे गौरव बापट म्हणाले.


आधी माघार... अन् नंतर थेट व्हिलचेअरवरुन एन्ट्री
खासदार गिरीश बापट यांनी आजारपणाचं कारण देत प्रचारातून माघार घेतली होती. त्यांनी पत्र काढत यासंदर्भात माहिती दिली होती. कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक 26 फेब्रुवारी 2023 रोजी जाहीर झाली. गेले तीन महिने प्रकृती अस्वास्थ्यामुळे खूप कमी काम केले असून तरीसुद्धा मला आठवड्यातून दोन ते तीन वेळा डायलिसिस करावं लागत आहे. त्यामुळे सध्या डॉक्टरांनी बाहेर न फिरण्याचा सल्ला दिला आहे. आजारपणाच्या कारणास्तव सदर पोटनिवणुकीसाठी मी वैयक्तिकरित्या मतदारसंघात फिरुन प्रचार करु शकणार नाही, असं त्यांनी पत्राद्वारे सांगितलं होतं. मात्र 16 तारखेला त्यांनी केसरी वाड्यात व्हिलचेअरवरुन त्यांनी बैठकीला हजेरी लावली. त्यामुळे गिरीश बापटांच्या या प्रचारात सहभागी होण्याच्या निर्णयामुळे भाजपला फायदा होण्याची शक्यता आहे. 


आणखी वाचा ;
अमित शहा पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या भेटीला, पाहा फोटो