पुणे : मावळ मधील पाचाणे गावात पेढ्याच्या प्रसादातून अडीचशेहून अधिक भाविकांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. पायाबा महाराजाच्या उत्सवानिमित्त आयोजित ऊरुसासाठी पेढ्याचा प्रसाद होता.


शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास प्रसाद खाल्ल्यावर अनेक ग्रामस्थांना उल्टी आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला. अनेकांना तात्काळ गावकऱ्यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. विषबाधितांमध्ये लहान मुलांची संख्या अधिक आहे. रुग्णांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच जवळपास 12 अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून 250 हून आधिक रुग्णांना वेगवेगळ्या आठ ते नऊ रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आलं. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टरांची एक टीम पाचाणे गावात दाखल झाली आहे.

रुग्णांवर तात्काळ उपचार करुन त्यांना पुढे रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. तळेगाव पोलिस घटनास्थळावर दाखल झाले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.