प्रचारादरम्यान पुण्यातील मनसे नगरसेविकेला मुलगा झाला!
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 11 Feb 2017 08:28 AM (IST)
पुणे : महापालिका निवडणुकांसाठी राजकीय प्रचाराला चांगलाच जोर आला आहे. एकीकडे निकालाची धाकधूक असताना पुण्यातील मनसे नगरसेविकेचा 'निकाल' मात्र मतदानाआधीच लागला आहे. हा निकाल आनंददायी असून नगरसेविका रुपाली पाटील यांना प्रचारादरम्यानच अपत्यप्राप्ती झाली आहे. पुण्यातील मनसेच्या विद्यमान नगरसेविका आणि यावेळी प्रभाग क्रमांक 15 मधुन निवडणूक लढवत असलेल्या रुपाली पाटील या गरोदर होत्या. प्रभागात अटीतटीची निवडणूक असल्यामुळे त्यांनी शुक्रवारी प्रभागात जोरदार प्रचार केला. मात्र प्रचार सुरु असतानाच त्यांना प्रसववेदना सुरु झाल्या. रुपाली पाटील यांना मनसे कार्यकर्त्यांनी लगबगीने प्रसुतिगृहात दाखल केलं असता त्यांना मुलगा झाला. ज्या दोन निकालांची रुपाली पाटील आतुरतेने वाट पाहत आहेत, त्यापैकी एकाचा तर सुखद निकाल लागला, मात्र दुसऱ्याचं काय होणार याकडे सगळ्यांचे डोळे लागून राहिले आहेत. दहा महापालिकांसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होणार आहे, तर 23 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे महापालिकांवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.