पुणे :  पुण्याजवळील नांदेड गावात एका माकडानं दहशत निर्माण केली आहे. गेल्या एक ते दीड महिन्यात या माकडानं गावातील  25 ते 30 नागरिकांचा चावा घेतला आहे. महिन्याभरापासून या गावात माकडांची एक टोळी आली आहे. या टोळीत 10 ते 15 माकड आहेत. पण या टोळीतील एक माकड परिसरातील लोकांवर थेट हल्ला करु लागलं आहे.


आठवडाभरात गावात माकडांची दहशत चांगलीच वाढलीय. काल रात्री या माकडांनी पाच ते सहा लोकांचा चावा घेतला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या काही नागरिकांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत, तर काहींना चाव्यामुळे गंभीर इजा झाल्यानं ससून रुग्णालयामधे दाखल करण्यात आलं आहे.

गावातील अनेक ठिकाणी हे माकड सीसीटीव्हीत कैद झाले आहे. काही ठिकाणी नागरिक तर काही ठिकाणी लहान मुलांना चावा घेतला आहे. स्थानिक नागरिक वनविभागाच्या मदतीने या माकडाला पकडण्यासाठी प्रयत्न करत आहेत, मात्र या माकडाला पकडण्यात अजून यश आलेल नाही.