Pune Monsoon Update: पुणे शहरात संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. कोथरुड, डेक्कन, सदाशिव पेठ, जंगली महाराज रोजवर या परिसरात पावसानं हजेरी लावली.  वादळी  वाऱ्यासह अचानक पाऊस आल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. गेले अनेक दिवस पुण्यात वातावरण उष्ण होतं. या पावसामुळे आता पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.


पुण्यातही काही भागात जोरदार तर काही ठिकाणी पावसाचा तुरळक शिडकावा झाला. दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह तुरळक पाऊस झाला. यामध्ये खडकवासला, उत्तमनगर, बाणेर, बालेवाडी, बिबवेवाडी इथं तुरळक पाऊस झाला. तर सिंहगड रस्त्यावर, जंगली महाराज रोडवर मुसळधार पाऊस झाला. सातारा रस्ता, सहकारनगर अरण्येश्वर परिसरातही हलक्या सरी पडल्या. 


अचानक संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास ढग गडगडले आणि पुण्यात पावसाने हजेरी लावली . अचानक आलेल्या पावसामुळे अनेक नागरिकांची तारांबळ उडाळी. पुण्यातील जंगली महाराज रोजला पहिल्याच पावसाने झोडपून काढल्याचं चित्र आहे. पहिल्याच पावसात शहरात अनेक ठिकाणी पाणीसुद्धा साचलं आहे. दरवर्षीपेक्षा यंदा पुणे जिल्ह्यात दोन महिने उन्हाचा चांगलाच तडाखा होता. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. आता अखेर मान्सून जिल्ह्यात दाखल झाल्याने बळीराजा सुखावला आहे. 


गेल्या काही दिवसांपासून अडकलेली मान्सूनची (Monsoon) गाडी रूळावर आली असून मान्सूननं हळूहळू पुढे सरकण्यास सुरुवात केली आहे. मान्सून कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. त्यासोबतच राज्यात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. यातच पुणे, पिंपरी-चिंचवड मधील अनेक परिसरात पावसाच्या कुठे हलक्या तर कुठे मुसळधार सरी बघायला मिळाल्या. 


11जून ते 13 जून या दिवसांमध्ये हलक्या सरींचा पाऊस पडणार, असा अंदाज पुण्याच्या हवामान खात्याने दर्शवला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार पुण्यासह महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यांमध्ये मान्सूनपुर्व पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावर्षी अपेक्षेपेक्षा उशीरा मान्सून दाखल होणार  असल्याचं वेधशाळेनं सांगितलं आहे.