पुणे :  अधिकाऱ्यांच्या चुकीमुळं महापालिकेला लाखोंचा चुना लागू शकतो, हे सिद्ध करणारं एक प्रकरण पुण्यात समोर आलं आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते भरत सुराणा यांनी मागविलेली महिती वेळेत न दिल्यानं महापलिकेला लाखोंचं नुकसान झालं आहे.

नगरसेवक आणि महापालिका कर्मचारी यांच्या वैद्यकीय उपचारावर होणारा खर्च, औषधांची बिलं, औषधांची माहीती सुराणा यांनी माहिती अधिकारात मागविली होती. परंतु महिन्याच्या मुदतीत अधिकाऱ्यांनी ही माहिती न दिल्यानं सुराणा यांनी त्याविरोधात अपील केलं.

यानंतर महापालिकेला या संदर्भातील तब्बल 45 हजार कागदपत्राची झेरॉक्स कॉपी सुराणा यांना मोफत द्यावी लागली. ज्याचा खर्च तब्बल सव्वा लाख इतका आहे.

दरम्यान, ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही चूक केली, त्यांच्या पगारातून हे पैसे वसूल करावेत, अशी मागणी आता महिती अधिकार कार्यकर्त्यांनी केली आहे.