पुणे : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध महायुती यांच्यातील राजकीय फटकेबाजी चांगलीच रंगल्याचं दिसून आलं. महायुती सत्तेत असल्याने सत्तचा दुरुपयोग करुन, पोलिस बळाचा वापर करुन आम्हाला दाबण्यात येत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी केला आहे. पुणे लोकसभा निवडणुकीच्या एक दिवस अगोदर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी पोलीस ठाणे गाठून भाजपकडून पैशांचं वाटप होत असल्याचा आरोप केला होता. त्याच, अनुषंगाने आता धंगेकर यांनी पोलिसांना पत्र लिहून खडा सवाल केला आहे. पोलिस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी असा प्रश्न विचारला आहे. देशात इंडिया आघाडीची सत्ता आल्यानंतर पोलिस भाजप नेत्यांवर कारवाई करणार आहेत का, असा सवालही धंगेकर यांनी पोलिसांना (Police) लिहिलेल्या या पत्रात केला.
पुणे लोकसभा मतदारसंघाची १३ मे रोजी निवडणूक झाली. या निवडणुकीच्या आदल्या रात्री भाजपकडून मोठ्या प्रमाणात पैसे वाटप करण्यात आले. रात्रीच्या अंधारात सुरू असलेले हे पाप काँग्रेसच्या कार्यकत्यांनी उजेडात आणले. पैसे वाटणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांवर तातडीने गुन्हा दाखल करा, अशी मागणी आम्ही सहकारनगर पोलिसांकडे केली. मात्र, पोलिसांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले नाही. पैसे वाटणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला नाही, म्हणून लोकशाही मार्गाने मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली.
आंदोलन, उपोषण हे लोकशाहीने, राज्यघटनेने या देशातील जनतेला बहाल केलेले अस्व आहे. लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन केले. पण, दोन दिवसानंतर आमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र त्याचवेळी माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, विनोद वस्ते, सुभाष जगताप आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनीही सहकारनगर पोलीस चौकीबाहेर आंदोलन केले होते.या आंदोलनाचे वृत्त विविध दैनिकांत आणि वाहिन्यांवर प्रकाशित ही झालेले आहे. असे असताना त्यांच्यावर कसल्याही स्वरूपाचा गुन्हा अद्यापपर्यंत पोलिसांनी दाखल केला नाही, असे धंगेकर यांनी पत्रातून म्हटले आहे.
भाजप सत्ताधारी पक्ष आहे, म्हणून त्यांच्या कार्यकत्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही का? की पोलीस लोकसभा निवडणुकीचा निकाल 'इंडिया आघाडी'च्या बाजूने लागल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणार आहेत? पोलिसांची नेमकी भूमिका काय आहे? हे जनतेला समजले पाहिजे. पोलिसांनी एकाची बाजू झाकून ठेवणे आणि दुसऱ्यावर गुन्हा दाखल करणे, हे कितपत योग्य आहे? मतदानाच्या दिवशी पाटील ईस्टेट झोपडपट्टी येथे भाजपच्या कार्यकत्यांना पैसे वाटप करताना माझ्या कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतरही पोलिसांनी त्यांना सोडून दिले हे कितपत योग्य आहे? निवडणुकीच्या दिवशी हेमंत रासने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी फडके हौद परिसरात ठिव्याआंदोलन केले. हे प्रकरणही पोलिसांनी झाकून ठेवले, त्यांच्यावरही कसल्याही स्वरूपाचा गुन्हा अद्यापपर्यंत दाखल झाला नाही, असे धंगेकर यांनी म्हटले आहे.
आमच्यावरच गुन्हा का?
आमच्यावरच गुन्हा दाखल करण्याचे कारण काय? पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी? असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे माझी आपणाकडे अशी मागणी आहे की, पोलिसांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला तसाच भाजपच्या कार्यकत्यांवरही गुन्हा दाखल झाला पाहिजे. तो अद्याप का दाखल झाला नाही, याबद्दल संबंधित पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे, वेगवेगळी वागणूक दिल्याबद्दल ते दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाईसुद्धा झाली पाहिजे. आपण माझ्या मागणीची योग्य ती दखल घ्याल, असा मला विश्वास वाटतो, अशी अपेक्षाही आमदार धंगेकर यांनी व्यक्त केली आहे.
धंगेकरांची खंत, पोलिसांना सवाल
पुणे लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी रवींद्र धंगेगकर यांनी भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप करत सहकारनगर पोलीस स्टेशनसमोर आंदोलन केले होते. त्यानंतर, आमदार रवींद्र धंगेकर आणि काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर, दुसऱ्या दिवशी मतदान सुरू असताना भाजप नेते हेमंत रासने यांनी देखील फडके हौद चौकात आंदोलन केले होते. मात्र, पोलिसांनी रासनेंवर गुन्हा दाखल केला नाही, फक्त आपल्यावरच गुन्हा दाखल केल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी पत्रातून केला आहे.