पुणे : मुंबईतील घाटकोपर दुर्घटनेनंतर पुण्यातही (Pune) होर्डींग कोसळल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर पुणे महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी अनधिकृत होर्डिंग्ज पुढील 7 दिवसात काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, जे कारवाई करणार नाहीत त्यांना परिणाम भोगावे लागतील असा सज्जड दम देखील त्यांनी अधिकाऱ्यांना दिलाय. महापालिका आयुक्त यांनी स्वतः पुण्यातील रस्त्यावर फिरून या होर्डिंग्जचा आढावा घेतला आहे. त्यातच, आज आणखी एक होर्डींग कोसळल्याची घटना पुण्यात घडली आहे. राज्यातील काही भागात आज पुन्हा मुसळधार (Rain) पाऊस पडला असून विदर्भातील अकोला, कोकणातील सिंधुदुर्गातही पावसाने हजेरी लावली होती. सिंधुदुर्गात (Sindhudurg) वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला आहे.    


पुणे सोलापूर रोडवरील गुलमोहर लॉन्स येथे ही घटना घडली असून टोलनाक्या शेजारी उभारलेलं मोठं होर्डिंग मुसळधार पावसामुळे कोसळलं आहे. या होर्डिंगशेजारी बँड पथक उभे होते, अचानक वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसात हे होर्डींग बँड पथकावर पडल्यामुळे बँड पथकाचे नुकसान झाले आहे. तर, बँड पथकातील होर्डींगखाली अडकून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. बँड पथकातील लोकांनी तत्काळ घोड्याला बॅनरखालून बाहेर काढले आहे, सध्या घोड्यावर उपचार करण्यात येत आहे. 


पुणे सोलापूर रस्त्यावरील कवडीपाट टोल नाका इथे लग्नाची मिरवणूक सुरु होण्याआधी मंगल कार्यालयाजवळील होर्डींग सोसाट्याच्या वाऱ्यामुळे खाली कोसळले. त्यामधे नवरदेवासाठी आणलेला घोडा गंभीर जखमी झाला असून बॅड पथकाच्या गाडीसह इतर वाहनांचेही नुकसान झालं आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर  गुलमोहर लॉन्स या कार्यालयासमोरील होर्डिंग थेट कार्यालयाच्या समोर कोसळून हा प्रकार घडला. त्यामधे दुचाकी, चार चाकीसह बँड वादकांच्या गाडीचेही नुकसान झालं आहे. सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नाही.  


सिंधुदुर्गात वादळी वाऱ्यासह पाऊस


तळकोकणात मान्सून पूर्व पावसाची दमदार हजेरी झाल्याचं पाहायला मिळालं. सिधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्गसह सह्याद्री पट्ट्यात वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पाऊस कोसळला. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह, तर काही ठिकाणी रिमझिम पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, 


अकोल्यात केळी बागांचं नुकसान 


अकोल्यात पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे, अकोला जिल्ह्यातील अकोट आणि तेल्हारा तालुक्याला आज सायंकाळी 4 नंतर अवकाळी पावसाने चांगलं झोडपून काढले. या अवकाळी पाऊस आणि सोबतच जोराच्या वाऱ्यामूळ रस्त्यावरील झाडे उन्मळून पडले तर रुईखेड आणि पणज भागात केळी पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आधीच अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेला शेतकरी, पुन्हा एकदा आस्मानी संकटाला समोर गेलाय. अकोट भागात 30 मिनिटपेक्षा जास्तवेळ हा मुसळधार पाऊस आणि जोराचा वारा सुरू होता. या पावसामुळे स्थानिकांचं नुकसान झालंय, तर शेतकऱ्यांच्या फळबागांचंही नुकसान झालं आहे.