Pune Miraj railway : पुणेकरांसाठी (pune News) एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुणे-मिरज रेल्वेमार्गाचं (Pune Miraj railway) काम पूर्ण झालेय. निरीक्षण झाल्यानंतर या मार्गावर अधिक वेगाने रेल्वे धावतील. मिरज, सांगलीवरुन पुण्याला येणाऱ्या लोकांचं प्रमाण मोठं आहे. त्याशिवाय पुण्यातील लोकांचाही तिकडे जाण्याचा कल जास्त असतो. त्यामुळे पुणे-मिरज असा प्रवास करणाऱ्यांसाठी ही दिलासादायक वृत्त आहे. सध्या सांगली आणि मिरजदरम्यान इंटरलॉकिंगचं काम यशस्वी झालेय. पुणे - मिरज (Pune Miraj railway) या मार्गाचं आता निरीक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतर रेल्वेसाठी हिरवा कंदील दिला जाईल. या मार्गावर आता रेल्वेची चाचणी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-मिरज या मार्गाचं दुहेरीकरण झाल्यामुळे आधीपेक्षा जास्त वेगाने आता रेल्वे धावतील.
117 प्रति तास वेगानं धावणार रेल्वे -
पुणे-मिरज रेल्वेमार्गाच्या (railway) लांबी 279.5 किमी इतकी आहे. या मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सांगली आणि मिरज स्टेशनदरम्यान अंतिम टप्प्यात आलेय. दोन्ही स्टेशनमधील इंटरलॉकिंगचं काम पूर्ण झाल्यानंतर मध्य रेल्वे सुरक्षा आयुक्त जनक कुमार गर्ग याचं निरीक्षण करतील. त्यानंतर रेल्वे ट्रॅफिकसाठी मंजूरी दिली जाणार आहे. पुणे-मिरज या मार्गावर रेल्वे आता प्रति तास 117 किमी वेगानं धावेल. दुहेरी मार्गावरुन रेल्वेवाहतूक सुरू झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी, व्यापारी, नोकरदारांसाठी गतीमान प्रवासाची सोय होणार असून परिसरातील अर्थविकासाला चालना मिळेल.
250 पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत -
रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार पुणे-मिरज रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचं काम मध्य रेल्वेच्या पुणे विभागामार्फत सुरु करण्यात येणार होतं. मध्य रेल्वेचे उच्च अधिकारी रामकरण यादव यांच्या नेतृत्वात सांगली-मिरज यामधील दुहेरीकरणाचं काम पूर्ण झाले आहे. या मार्गाची लांबी 9.48 किी इतकी लांब आहे. दुहेरीकरणाच्या कामासाठी 250 कर्मचारी राबलेत.
पुणे-मिरज रेल्वेची दुसऱ्या मार्गिकेसाठी भूसंपादन -
पुणे- मिरज रेल्वेमार्गाच्या दुसऱ्या मार्गिकेची एकूण 280 कि. मी. पैकी पुणे जिल्ह्यातील बाधित लांबी 35 कि.मी. इतकी आहे. यासाठी जिल्ह्यातील 14 गावातील एकूण 18 हेक्टर जमिनीची आवश्यकता होती. यात पुरंदर तालुक्यातील आंबळे, बेलसर, धालेवाडी, दौंडज, पिंपळे खुर्द, वाल्हा, पिसुर्टी, थोपटेवाडी, जेजुरी ही 9 गावे, हवेली तालुक्यातील लोणी काळभोर, फुरसुंगी आणि वळती ही तीन तर दौंड तालुक्यातील डाळींब आणि ताम्हणवाडी या दोन गावांचा समावेश आहे.भूसंपादन करण्यात आलेल्यापैकी 13.10 हे. आर ही खासगी जमीन होती. तर 0.3475 हे. आर सरकारी जमीन तर 4.55 हे. आर वनजमीन हस्तांतरीत करण्यात आली.
सर्वसामान्यांना फायदा -
दुहेरी रेल्वेलाईनमुळे रेल्वेवाहतूक वेगवान होणार असल्याने त्याचा फायदा दैनंदिन प्रवास करणारे नागरिक, नोकरदार, व्यापारी आदींना होणार आहे. महत्वाचे म्हणजे प्रवासाचा वेळ कमी होणार असल्याने शेतमाल तसेच अन्य नाशवंत माल लवकर बाजारपेठेत पोहचल्याने नुकसान कमी होऊन मालाला जास्त दर मिळू शकेल. दुहेरी रेल्वेलाईनमुळे क्रॉसिंगसाठीचा वेळ वाचणार असल्याने रेल्वे मार्गावरील गावातील नागरिकांची गैरसोय दूर होईल.