पुणे : पुण्यातल्या मेट्रो प्रकल्पाचं कामकाज सध्या जोरात सुरु आहे. तसेच पुढच्या 3 वर्षात पुण्यात मेट्रो धावू लागेल, असं आश्वासन महामेट्रोचे कार्यकारी संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिलं आहे.दीक्षित यांनी आज पुण्यात महामेट्रोच्या वतीने हे खास प्रेझेंटेशन देण्यात आलं. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.


तसेच, मेट्रोसाठी नदी पात्रातील एलिव्हेटेड मार्गाच्या विरोधात एनजीटीमध्ये याचिका दाखल करण्यात आली होती.मात्र, सर्वोच्च न्यायालयाने मेट्रोचं काम सुरुच ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मेट्रोला कसलाही अडथळा येणार नाही, असंही ब्रिजेश दीक्षितांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, प्रेझेंटेशनच्या वेळी पुणे महापालिकेत उपस्थित असणाऱ्या नगरसेवकांना मेट्रो बाबत काही प्रश्न विचारायचे होते. मात्र त्या प्रश्नांची उत्तरं न देताच सभा गुंडाळण्यात आली, असं सांगत नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली.

दुसरीकडे नागपूर मेट्रोची शनिवारी संध्याकाळी ट्रायल रन यशस्वीपणे घेण्यात आली. नागपूरच्या मिहान डेपो ते एअरपोर्टपर्यंत ही ट्रायल रन घेण्यात आली.

नागपूर मेट्रोचं पहिल्या टप्प्यातील काम पूर्णत्वाकडे जात असताना, दुसरीकडे पुण्यातली मेट्रो प्रत्यक्षात कधी धावणार यावर विविध चर्चा रंगत होती. पण त्यावर महा मेट्रोच्या कार्यकारी संचालकांनी तीन वर्षात काम पूर्ण करुन, मेट्रो सुरु करण्याचं आश्वासन दिल्यानं, पुणेकरांच्या मेट्रोसाठीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.