पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा पुण्यातील पहिला भूमिगत मेट्रो मार्ग (Pune Metro) प्रवाशांसाठी सुरू झाला आहे. पुणेकरांनी या मेट्रोतून प्रवास करण्यास देखील सुरुवात केली आहे. मात्र यावेळी चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला असाच प्रत्यय पुणेकरांना येत असल्याचे दिसून येत आहे. कारण पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये आहे पण प्रवाशांना पार्किंगसाठी तासाला 35 रुपये मोजावे लागल्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. 


जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते 26 सप्टेंबरला होणार होते. मात्र पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ते रद्द करण्यात आले. त्यानंतर रविवारी (दि. 29) पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने या मेट्रो मार्गाचं लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीतील प्रमुख नेते या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित होते. 


पार्किंगसाठी तासाला 35 रुपये


आता पुण्यातील जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो सुरु झाली. पुणेकरांनी मेट्रोतून प्रवासालाही सुरुवात केली आहे. मात्र मेट्रोच्या तिकिटांपेक्षा मेट्रो स्थानकावर पार्किंगची तिकीट जास्त असल्याने मेट्रो प्रशासनावर पुणेकरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली. मेट्रोची तिकीट 15 रुपये आणि पार्किंगची तिकीट 15 रुपये प्रतितास दुचाकीला आणि 35 रुपये प्रतितास चार चाकीला आकारण्यात आले होते. 


ठेकेदाराचं कंत्राट केलं रद्द 


पहिल्याच दिवसापासून ठेकेदाराकडून वसुलीला सुरुवात झाली होती. मात्र हा प्रकार आणि पुणेकरांचा रोष पाहून मेट्रो प्रशासनाने थेट ठेकेदाराचं कंत्राट रद्द केलंय. त्यामुळे पुढची रक्कम निश्चित होईपर्यंत आता मोफत गाडी पार्क करावी लागणार आहे. आता पार्किंगचे नवीन दर किती निश्चित होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


लोकार्पणाच्या कार्यक्रमातून मोदींचा विरोधकांवर निशाणा


लोकार्पणाच्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला होता. त्यांनी म्हटलं होतं की, पुणे ज्या गतीने पुढे जात आहे, त्याच गतीने सर्व सोयी सुविधा वाढल्या पाहिजे या दृष्टीने प्रयत्न केले गेले पाहिजेत. पुण्याचा मोठ्या गतीने विकास होतो आहे, महायुती याच अनुषंगाने मोठे काम करत आहेत. आता सुरू असलेला विकास खूप आधी येणं अपेक्षित होतं. मात्र आधी प्लॅनिंग आणि विकासाला विलंब झाला. जर अशा कोणती योजना बनली तर ती फाईल वर्षोंवर्षे तशीच धुळखात पडत होती. 2002 साली या मेट्रोची चर्चा होती, मात्र आमचं सरकार आलं त्यानंतर याला चालना मिळाली. जुनं सरकार 8 वर्षात एका एक पिलर उभं करू शकली नव्हती, मात्र, आमच्या सरकारने तुमच्या सेवेत मेट्रो आणली, असं म्हणत मोदींनी विरोधकांना लक्ष्य केलं. 


आणखी वाचा


Uday Samant: पुण्यात मेट्रो लोकार्पण कार्यक्रमावेळी उद्योगमंत्र्यांचा मोबाईल हरवला अन्...; उदय सामंतांनी सांगितलं नेमकं काय घडलं?