पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडच्या विकासाचं ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित जसराज यांनी तोंडभरुन कौतुक केलं आहे. पंडित जसराज यांनी गायलेल्या कौतुकाचा पाढा आपण महापालिका निवडणुकीच्या प्रचारात गाणार असल्याची कोपरखळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मारली.
शहरातील रस्ते असावेत तर पिंपरी-चिंचवडसारखे, मुंबईमध्ये असे रस्ते कधी होणार? असा प्रश्न पंडितजींनी उपस्थित केला. पालिका असावी तर पिंपरी चिंचवड सारखी, असंही जसराज यांनी म्हटलं. यावर पंडित जसराज यांनी गायलेला कौतुकाचा पाढा येत्या महापालिका निवडणूक प्रचारात गाणार असल्याचं अजित पवार यांनी सांगताच सभागृहात एकच हशा पिकला.
पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे आयोजित 18 व्या स्वरसागर संगीत महोत्सवाच्या उदघाटन सोहळ्यात अजित पवार यांच्या हस्ते जसराज यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्यानंतर जसराज यांनी दिलखुलास दाद दिली.
नोटाबंदीच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी अजित पवारांनी थेट परमेश्वरालाच साकडं घातलं. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशीच आम्हा सर्वांवरील नोटाबंदीचं संकट दूर झाल्याच्या शुभेच्छा सरकारकडून मिळाव्यात, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो, असं म्हणत पुन्हा एकदा अजित पवार यांनी सरकारला चिमटा काढला.