पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्मार्ट सिटी कार्यक्रमाला पुणे महापालिकेचे महापौर अखेर हजर राहणार आहेत.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये महापौरांच्या नाराजी प्रकरणी चर्चा झाली. त्यानंतर राष्ट्रवादीकडून फक्त महापौर हजर राहतील असं जाहीर करण्यात आलं आहे.

 

मुख्यमंत्र्यांनी फोन केल्यानंतर पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी महापौर प्रशांत पवार यांची समजूत काढली. तसंच शरद पवार आणि राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. त्यानंतर महापौर कार्यक्रमाला हजेरी लावतील, असा निर्णय घेण्यात आला. आज सायंकाळी चार वाजता बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलावर हा कार्यक्रम होणार आहे.

 

पुण्यातील स्मार्टसिटीच्या कार्यक्रमावर शिवसेनेचा बहिष्कार


 

तरीही भाजप एकाकी

महापौर कार्यक्रमाला हजर राहणार असले तरीही या कार्यक्रमासाठी भाजप एकाकी असल्याचं चिन्ह आहे. राष्ट्रवादीच्या वतीने केवळ महापौर हजर राहणार आहेत. तर संपूर्ण पक्षाचा बहिष्कार कायम असणार आहे. भाजपचा मित्रपक्ष आरपीआय देखील या कार्यक्रमात सहभागी होणार नाही.

 

 

पुणे महापालिकेची आगामी निवडणुक लक्षात घेऊन सर्व पक्षियांनी ही खेळी आखल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे सर्व पक्षांनी या कार्यक्रमाच्या निमीत्ताने निवडणुकीचं रणशिंग फुंकलं असल्याचं चित्र आहे.