पुणे : मराठा मोर्चाने 9 ऑगस्ट रोजी पुकारलेल्या 'महाराष्ट्र बंद' दरम्यान जी तोडफोड झाली ती, मराठा आंदोलनात घुसलेल्या बाह्यशक्तीमुळे झाली, मराठा समाजातील बांधवांनी केलेली नाही, असा दावा मराठा समन्वय समितीने पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला.

मराठा आंदोलनात झालेल्या हिंसेचा आम्ही निषेध करतो. ज्या सामान्य नागरिकांना, पत्रकारांना काल त्रास झाला, त्यांची दिलगिरी व्यक्त करत असल्याचं मराठा समन्वयक म्हणाले.

मराठा आंदोलनात काही बाह्यशक्ती म्हणजेच समाजकंटक घुसले होते, जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी तोडफोड केली. मराठा समाजातील बांधवांनी हिंसेचा अवलंब केला नसून विनाकारण त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा दावाही समितीने केला.

यापुढे आम्ही रस्त्यावर आंदोलन करणार नाही, मागण्या मान्य होईपर्यंत तालुका स्तरावर साखळी उपोषण करणार, 15 ऑगस्टपासून चूलबंद करुन अन्नत्याग आंदोलन करणार, अशी माहितीही मराठा समन्वय समितीने पत्रकार परिषदेत दिली.

आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं, परप्रांतीय कामगारांनी असुविधांचा असंतोष कालच्या मराठा मोर्चात व्यक्त केला.
त्यामुळे शांततेने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांविरोधातील गुन्हे मागे घ्या, अशी मागणीही मराठा समन्वयकांनी राज्य सरकारकडे केली आहे. मराठा मोर्चाचे स्वयंसेवक समाजकंटकांना पकडून देतील, अशी हमीही त्यांनी यावेळी दिली.

आम्ही सर्वांना पोटतिडकीने शांततेचं आवाहन करत होतो, मात्र दुपारनंतर तोडफोड झाली. तोडफोड करणारे कोण हे पोलिस तपासात समोर येईल, झाल्या प्रकाराबद्दल पुणे मराठा मोर्चा माफी मागतो, असंही समन्वयकांनी सांगितलं.

वळूज एमआयडीसीत ज्या कंपन्यांची तोडफोड झाली आहे, त्या कंपन्यांतील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी घ्यावं, आंदोलनात तोंड बांधून तोडफोड करण्यात आली. यापूर्वी कोणीही तोडफोड केली नाही, मग आताच का झाली? या तोडफोडीची सीआयडी चौकशी करा, अशी मागणी मराठा मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी केली. मराठा मोर्चा आयोजकांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेत, तोडफोडीच्या घटनेचा निषेध करत, सीआयडी चौकशीची मागणी केली.