Pune Ganapati Visarjan Case : पुणे (Pune) शहरात लक्ष्मी रोडवरून गणपती विसर्जन (Pune Ganapati Visarjan) मिरवणुकीच्यावेळी शहरातील पाच मानाच्या गणपतींना प्रथम मार्गस्थ होण्याची परंपरा आणि रूढी आहे. त्यानंतर अन्य गणपती मंडळांना विसर्जन मिरवणूकीला रस्ता खुला केला जातो. मात्र, अशा अटी आणि परंपरा या संविधानातील कलम 19 नुसार असलेल्या संचार स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे. याबाबत हायकोर्टात (High Court) सुनावणी होणार आहे, असा दावा करत 'बढाई समाज ट्रस्ट'चे अध्यक्ष शैलेश बढाई यांनी उच्च न्यायालायात (Bombay Highcourt) धाव घेत याचिका केली आहे. 


पुण्याची गणेश विसर्जन मिरवणूक ही राज्यभरातील भाविकांच्या आकर्षणाचं केंद्र असतं. पुण्यातील हजारो मंडळं सुदंर असे विसर्जन रथ तयार करून, त्यावर गणपती बाप्पाला ठेऊन मिरवणुकीत सहभागी होतात. मात्र सकाळी दहा वाजता सुरु झालेल्या या मिरवणुकीत मनाच्या पाच गणपतींचं विसर्जन होता होता दिवस संपून जातो. त्यामुळं इतर हजारो मंडळांना ताटकळत राहावं लागतं. पोलीस आणि प्रशासनाकडे याबाबत अनेकदा दाद मागून देखील दखल न घेतली गेल्यानं पुण्यातील गणेश मंडळांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 


पुण्यातल्या गणपती विसर्जनाचा सोहळा आता काही दिवासांवर आलाय आणि मानाच्या मिरवणुकींवरून सुरु झालेल्या वादावर हायकोर्टात काय निर्णय होणार याची उत्सुकता वाढली आहे. मुंबई हायकोर्टात (Bombay High Court) आज त्यावर सुनावणी होणार आहे. पुण्यात मानाच्या पाच गणपतींची मिरवणूक झाल्यानंतर अन्य मंडळांना विसर्जन मिरवणुकीसाठी परवानगी देण्याच्या परंपरेला यावेळी 'बढाई समाज ट्रस्ट'चे अध्यक्ष शैलेश बढाई यांनी उच्च न्यायालायात आव्हान दिलं आहे. या अटी आणि परंपरा संविधानातील कलम 19 नुसार असलेल्या स्वातंत्र्याचं उल्लंघन आहे, असा दावा करत बढाई यांनी कोर्टात आव्हान दिलं आहे. मानाच्या गणपतीआधी छोट्या मंडळांना विसर्जन मिरवणुकांची परवानगी द्यावी, अशी त्यांची मागणी आहे. हायकोर्ट त्यावर काय निर्णय देणार याकडे पुणेकरांचं लक्ष लागलं आहे.


दरम्यान, पुण्यातील विसर्जन मिरवणुकीच्या या वादाला मोठा इतिहास आहे. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केल्यानंतर दुसऱ्याच वर्षी म्हणजे, 1894 ला पुण्यातील गणेश मंडळांमध्ये आधी विसर्जन कोणी करायचं यावरून वाद निर्माण झाला. हा वाद लोकमान्य टिळकांपर्यंत पोहचल्यावर पुण्याचं ग्रामदैवत म्हणून विसर्जनाचा पहिला मान कसबा गणपतीला, पुण्याची ग्रामदेवता म्हणून दुसरा मान तांबडी जोगेश्वरीला राहील असं ठरलं. पुढे तिसरा मान गुरुजी तालीम, चौथा मान तुळशीबाग आणि पाचवा मान केसरीवाडा या गणेश मंडळांना राहील अशी प्रथा रूढ झाली.