पुणे : तुमचा मोबाईल नंबर कंपनीकडून सिलेक्ट झाला असून तुम्हाला बक्षीस मिळालं आहे, असं सांगत एक-दोन नव्हे तर तब्बल 2100 जणांना गंडा घालणाऱ्या भामट्याला पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.


बालाजी रामचंद्र मद्दीपटला असं या भामट्याने नाव आहे. नवीन सिमकार्ड घेणाऱ्यांचे मोबाईल क्रमांक मिळवून त्यांना लॉटरी लागल्याचे आमिष बालाजी दाखवायचा. तुम्हाला 1899 रुपयांचं बक्षीस लागले असून त्यामध्ये एचएमटी कंपनीचं एक घड्याळ, गोल्ड प्लेटेड अमेरिकन डायमंड चेन फक्त 550 रुपयांमध्ये मिळणार आहे, असं तो सांगायचा.

लोकांचा विश्वास संपादन केल्यानंतर तो त्यांच्याकडून 550 रुपये घ्यायचा. त्या मोबदल्यात 70 रुपयांचं बनावट एचएमटी घड्याळ आणि सोन्याची खोटी चेन द्यायचा. या भामट्याची माहिती पोलिस शिपाई प्रशांत गायकवाड यांना खबऱ्यामार्फत मिळाली.

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रारही दाखल करण्यात आली होती. मंगळवारी पोलिसांनी आरोपी मद्दीपटला याला अटक करुन त्याच्या घरातून बनावट एचएमटी घड्याळ आणि अमेरिकन डायमंड असलेली सोन्याची बनावट चेन असा 90 हजार रुपयांचा माल जप्त केला.

आरोपी बालाजी मद्दीपटला याने 2100 जणांना गंडा घातल्याची माहिती पुढे आली आहे. पुणे पोलिसांनी असल्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आव्हान नागरिकांना केलं आहे.