प्रियकराने प्रेयसीला चाकूने भोसकलं, दुसऱ्या तरुणाशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून कृत्य
एबीपी माझा वेब टीम | 12 Jun 2019 11:24 AM (IST)
प्रेयसीचं दुसऱ्या कोणाशी तरी अफेअर असल्याचा संशय किरण शिंदेला होता. त्यावरुन त्यांच्या सतत वाद होत होते.
पुणे : प्रेयसीचं दुसऱ्या तरुणाची प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरुन प्रियकराने तिची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना पुण्यात घडली आहे. चंदननगर परिसरात मंगळवारी (11 जून) रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. मीना पटेल (वय 22 वर्ष) असं मृत तरुणीचं नाव असून किरण शिंदे (वय 25 वर्ष) नावाचा आरोपी प्रियकर फरार आहे. मीना पटेल पुण्यातील एका कॉल सेंटरमध्ये काम करत होती. पण एक महिन्यापासून ती घरीच होती. तर आरोपी तरुण इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असून तो काळेवाडीत राहतो. एक वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होतं. पण सहा महिन्यांपासून त्यांच्यात वाद निर्माण झाले होते. प्रेयसीचं दुसऱ्या कोणाशी तरी अफेअर असल्याचा संशय किरण शिंदेला होता. त्यावरुन त्यांच्या सतत वाद होत होते. मंगळवारी रात्री दोघेह चंदननगर परिसरात भेटले. पण यावेळीही दोघांचं भांडण झालं. रागाच्या भरात आरोपी किरण शिंदेने मीनाच्या पोटात चाकूने भोसकलं आणि तिथून पसार झाला. तिथल्या काही जणांनी तिला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केलं. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. चंदननगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेत आहेत.