पुणे : ब्लॅकमेल करुन पैशांची मागणी करणाऱ्या प्रेयसीचा खून करुन मृतदेह जंगलात फेकून दिल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस घडली आहे. या प्रकरणी वारजे पोलिसांनी आरोपी विपुल भवरलाल शहा याला अटक करण्यात आली आहे.


प्रेरणा कांबळे असं मृत तरुणीचं नाव आहे. कामावर जात असल्याचं सांगून प्रेरणा 15 मार्च रोजी घरातून बाहेर पडली. पण दोन दिवस घरी न परतल्याने कुटुंबीयांना ती बेपत्ता झाल्याची तक्रार वारजे पोलिस ठाण्यात नोंदवली होती.

मयत प्रेरणा आणि विपुल यांच्यात अनेक वर्षांपासून प्रेमसबंधं होते. आरोपी विपुल शाह विवाहित होता. आपल्या प्रेमसंबंधांबाबत पत्नीला सांगेन, असं म्हणत प्रेरणा विपुलला ब्लॅकमेल करत होती. तसंच त्याच्याकडे पैशांची मागणीही करत होती. या सर्व प्रकाराला कंटाळून विपुलने तिचा काटा काढण्याचं ठरवलं.

तिला फिरण्यासाठी म्हणून तो एका मित्रासोबत मुळशी परिसरात घेऊन गेला. त्यानंतर कारमध्ये गळा आवळून तिचा खून केला आणि मृतदेह वाघजाई डोंगर परिसरात फेकून दिला. पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या मित्राला बेड्या ठोकल्या असून पुढील तपास सुरु आहे.