पुणे : पुण्यात (Pune) मागील अनेक दिवसांपासून हवेची (Air) गुणवत्ता खालावली आहे. दिवाळीत खास करून प्रत्येक वर्षी लक्ष्मी पूजनानंतर वायू प्रदूषणात (Air Pollution) प्रचंड वाढ झाल्याचं चित्र बघायला मिळतं. लक्ष्मीपूजनाला फटाके उडवले जातात आणि त्यामुळे आणखी त्रास होतो. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी निर्बंध घालण्यात आले होते.  मात्र पुण्यात कुठल्याच उपाययोजना केल्या गेल्या नव्हत्या. इतर वेळी स्वच्छ सुंदर पुणे ज्याला म्हंटल जायचं तिथली परिस्थिती सध्या चिंताजनक असल्याचं चित्र आहे. 

फटाक्यांच्या आतिषबाजीने होणारे प्रदूषण यामुळे श्वसनाचे त्रास नागरिकांना होत आहेत. याच कारणामुळे नागरिकही त्रस्त झाल्याचं चित्र आहे. सफर या संस्थेच्या आकडेवारीनुसार पी.एम.2.5 या धूलिकणांचे प्रमाण वाढलं असल्याचं सांगण्यात आलं. PM 2.5 मुळे हृदयविकार, दमा आणि नवजात मुलांच्या वजनात फरक पडणे यांसारख्या आरोग्य समस्यांचा धोका वाढू शकतो. PM 2.5 च्या वाढलेल्या पातळीमुळे दृश्यमानता कमी होऊ शकते आणि हवेत धुके दिसू लागते. सफर संस्थेच्या आकडेवारीनुसार सध्याची पुण्यातील स्थिती ही चिंताजनक आहे.

पुण्याची सध्याची प्रदूषणाची स्थिती

पु्ण्याचा सध्याचा  AQI हा 351 आहे. त्यातच Pollutant चा पीएम हा 2.5 इतका आहे. पुण्यातील इतर शहरांची स्थिती आणि त्यांचा  AQI किती आहे, हे सविस्तर जाणून घेऊयात. 

 

शहर  AQI
कोथरुड 358
शिवाजीनगर  381
पाषाण   314
लोहेगाव 350
कात्रज 341
निगडी 350
हडपसर 335
आळंदी 311
भोसरी 424
भुमकर चौक 314

अशी सध्याची पुण्याची स्थिती असली तरीही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून हवेची गुणवत्ता कमी होत नसल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे हवेचं प्रदूषण तेवढचं राहत असल्याचं देखील त्यांच्याकडून सांगण्यात आलं. दर हिवाळ्यात ही परिस्थिती पाहायला मिळते. या परिस्थितीला  inversion असं म्हटलं जातं. 

एकंदरीत गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातील हवेची गुणवत्ता खालावली आहे. राज्य सरकारकडून यावर सूचना देखील देण्यात आल्यात. त्याचप्रमाणे उच्च न्यायालायाने देखील प्रदूषणावरुन राज्य सरकारला खडेबोल सुनावले. अनेक शहरातील महापालिका प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करतायत. मात्र पुण्यात यातील काहीही करण्यात आले नाही. ना प्रशासनाने काळजी घेतली, ना नागरिकांनी. लक्ष्मी पूजनानंतर मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले, त्यावर कुठलेही निर्बंध नव्हते, वेळीची मर्यादा नव्हती. पुण्यात काल संध्याकाळी 7 वाजल्यापासून 27 आगीच्या घटना घडल्याचंही सांगण्यात आलं. त्यामुळे याबाबत काय करता येईल, यावर काय पावलं  उचलली जाणार हे बघणे महत्वाचे ठरेल. 

हेही वाचा : 

Pune and PCMC Air Pollution Guidelines : बांधकामांमधून होणारं वायू प्रदूषण रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून नियमावली जाहीर