पुणे : पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना महापौरांच्या दालनात महापौरांच्या समोर मारहाण झाल्याची घटना घडली आहे. जलपर्निची निविदा आठ पट दराने काढल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौर मुक्ता टिळक यांच्या दालनात बैठे आंदोलन केले.


यावेळी दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करा अशी मागणी विरोधीपक्षाच्या नगरसेवकांनी केली. यावेळी तेथे उपस्थित असलेले अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर हे महापौरांना माहिती देत होते. त्याचवेळी नगरसेवकांनी ज्यांच्या अधिकाराखाली निविदा प्रक्रिया राबवली त्यांच्याकडून खुलासा नको. अधिकारी चोर आहेत, असा आरोप काँग्रेसचे नगरसेवक रविंद्र धंगेकर यांनी केला.


रविंद्र धंगेकरांना प्रत्युत्तर देताना निंबाळकर यांनी असे ऐकून घ्यायला आम्ही आलेलो नाही, तुमची काय लायकी आहे, असं सुनावले. यामुळे संतापलेल्या नगरसेवकांनी, तुम्ही आमची लायकी काढणारे कोण, असं म्हणत निंबाळकरांना जाब विचारला.


त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या एकाने निंबाळकर यांच्यावर हात उगारला. या प्रकारानंतर महापौरांच्या कक्षेत महापौर, महापालिका आयुक्त, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आणि स्वतः राजेंद्र निंबाळकर यांची बैठक झाली. त्यानंतर महापौर मुक्ता टिळक यांनी माध्यमांशी संवाद साधला.


महापालिकेत कोणतीही गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, असं मुक्ता टिळक यांनी सांगितलं. त्यासोबत या प्रकाराची पोलिसांमध्ये तक्रार करायची की नाही हा निर्णय आयुक्त घेतील, असंही त्यांनी सांगितलं.
तर काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी मात्र ज्यांनी हात उगारला ते काँग्रेसचे कार्यकर्ते नाही असं सांगितलं. तो व्हिडीओ नीट बघून चौकशी करावी आणि जे दोषी आहेत त्यांवच्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.