पुणे : पुण्यातील सेंट्रल बिल्डिंगसमोर शिक्षकभरती व्हावी यासाठी अभियोग्यता चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. यातील काही उमेदवारांची तब्येत बिघडली आहे. त्यांना ससून रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. मात्र उपचार करुन ही मुलं पुन्हा उपोषणाला बसली आहेत.


डॉक्टरांनी या मुलांची तब्येत खालावल्यानं फळं आणि ज्यूस पिण्याचा सल्ला दिला आहे. असं न केल्यास या मुलांची प्रकृती आणखी खालवू शकते, असंही डॉक्टरांनी सांगितलं आहे. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्वत: फोन करून या मुलांशी संवाद साधला.


मात्र विनोद तावडे यांच्या फोन नंतरही या उपोषणावर तोडगा निघू शकलेला नाही. मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा पवित्रा या मुलांनी घेतला आहे. 24 हजार जागांची शिक्षक भरतीची जाहिरात एकाच टप्प्यात काढल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्यावर हे उमेदवार ठाम आहेत.


महाराष्ट्रभरातून इतर उमेदवारही येऊन या उपोषण करणाऱ्या उमेदवारांना पाठिंबा देत आहेत. दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री गिरीश बापट यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी मंगळवारी मुंबईला येऊन चर्चा करण्याची सूचना त्यांनी केली आहे. आंदोलनकर्त्यांचं एक शिष्टमंडळ मुंबईला जाणार आहे, मात्र मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरुच ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.


आठ दिवसांत शिक्षक भरतीची जाहिरात काढणार : विनोद तावडे


शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पुढील आठ दिवसांत पंधरा जिल्ह्यांमधील शिक्षक भरतीची पहिली जाहिरात काढली जाईल, असं तीन दिवसांपूर्वी जाहीर केलं आहे. "सरकारी शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी संस्थांची जाहिरात काढली जाणार आहे. जाहिरातीनंतरच्या पंधरा दिवसांत सर्व भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल. तसेच या भरतीदरम्यान संस्थाचालक घेत असलेल्या प्रत्येक मुलाखतीचे व्हिडिओ रेकॉर्डिंगदेखील केले जाईल. आगामी निवडणुकांचा विचार करुन आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल. ", असं विनोद तावडे यांनी सांगितले.