पुणे : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय नकाशावर वेगळे स्थान असलेल्या पुणे शहरात तब्बल आठ वर्षांनंतर पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. पुणे महानगरपालिकेच्या (PMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय हालचालींना वेग आला असून, भाजप विरुद्ध उर्वरित सर्व पक्ष अशीच लढत होणार असल्याचे चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. बदललेली राज्यातील सत्तासमीकरणे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील फूट, तसेच महाविकास आघाडीचे पुनरागमन यामुळे यावेळी पुण्यातील निवडणूक अधिक चुरशीची ठरणार आहे.(Pune Mahanagarpalika)

Continues below advertisement

Pune Mahanagarpalika: पुणे महानगरपालिकेची स्थापना आणि ऐतिहासिक वाटचाल

पुणे महानगरपालिकेची स्थापना 15 फेब्रुवारी 1950 रोजी झाली. स्वातंत्र्योत्तर काळात वाढणारी लोकसंख्या, शहरी विस्तार आणि नागरी सुविधांची गरज लक्षात घेऊन पुणे नगरपालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत करण्यात आले. सुरुवातीला शिक्षण, लष्करी छावणी आणि सांस्कृतिक परंपरा यासाठी ओळखले जाणारे पुणे पुढील काळात औद्योगिक, आयटी आणि सेवा क्षेत्राचे मोठे केंद्र बनले.

हिंजवडी आयटी पार्क, हडपसर-मगरपट्टा, बाणेर-बालेवाडी, कात्रज-कोंढवा अशा भागांच्या विकासामुळे पुण्याचा भौगोलिक विस्तार मोठ्या प्रमाणात वाढला. या विस्तारासोबतच पाणीपुरवठा, वाहतूक, कचरा व्यवस्थापन, पर्यावरण आणि गृहनिर्माण यांसारखी आव्हानेही वाढली. या सर्वांचा ताण पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनावर पडत राहिला.

Continues below advertisement

Pune Mahanagarpalika: महापालिकेची रचना आणि नगरसेवकांची संख्या

पुणे महानगरपालिकेच्या सामान्य सभेत 162 नगरसेवक असतात. हे नगरसेवक थेट जनतेतून निवडून येतात. महापौर हे शहराचे प्रथम नागरिक असले, तरी प्रत्यक्ष प्रशासकीय अधिकार महापालिका आयुक्तांकडे असतात. स्थायी समिती, विषय समित्या आणि विविध खातेप्रमुखांच्या माध्यमातून शहराचा कारभार चालवला जातो.

Pune Mahanagarpalika: 2017 ची महापालिका निवडणूक : राजकीय इतिहासातील टर्निंग पॉइंट

पुणे महापालिकेच्या राजकारणात 2017 ची निवडणूक हा मोठा टर्निंग पॉइंट ठरला. अनेक वर्षे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या पुण्यात भाजपने जोरदार मुसंडी मारली.

2017 निवडणूक निकालपक्ष जिंकलेल्या जागाभारतीय जनता पक्ष (BJP) 97राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)  39काँग्रेस 9शिवसेना 10मनसे    2AIMIM 1अपक्ष / इतर 4एकूण 162

Pune Mahanagarpalika: निकालाचे विश्लेषण

162 पैकी 97 जागा जिंकून भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले. हा निकाल पुण्यातील मध्यमवर्गीय, आयटी कर्मचारी आणि नव्या मतदारांचा कल भाजपकडे वळल्याचे दर्शवणारा ठरला. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) 39 जागा मिळाल्या, मात्र काँग्रेस 9 आणि शिवसेनेला केवळ 10 जागांवर समाधान मानावे लागले. मनसेने 2 आणि AIMIM 1 जागा मिळवली, मात्र, यांचा प्रभाव मर्यादित राहिला. तर 4 जागा अपक्ष उमेदवारांनी मिळवल्या होत्या.

या निकालानंतर पुण्यातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांतही भाजपचे वर्चस्व कायम राहिले. त्यामुळे भाजप हा पुण्यातील प्रमुख राजकीय पक्ष म्हणून प्रस्थापित झाला.

Pune Mahanagarpalika: रखडलेल्या निवडणुका आणि प्रशासक राजवट

पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील अनेक महापालिकांच्या निवडणुका 2017 मध्ये झाल्या होत्या. फेब्रुवारी 2022 मध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर निवडणुका अपेक्षित होत्या. मात्र, इतर मागासवर्गीय आरक्षण आणि प्रभाग रचना यावरून न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांमुळे तब्बल तीन वर्षे निवडणुका रखडल्या.

अखेर न्यायालयाने मे महिन्यात निकाल देत 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर निवडणूक आयोगाने प्रभाग रचना, आरक्षण सोडत आणि इतर प्रक्रिया पूर्ण करून तब्बल आठ वर्षांनंतर पुणे महापालिकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.

Pune Mahanagarpalika: बदललेली राजकीय समीकरणे आणि तिरंगी लढत

या तीन वर्षांच्या कालावधीत राज्यातील राजकारणात मोठे बदल झाले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत फूट पडली. सत्तासमीकरणे बदलली. याचा थेट परिणाम पुणे महापालिकेच्या निवडणुकीवर होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस युती होणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर, पुण्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी अशी तिरंगी लढत निश्चित झाली आहे. प्रत्यक्षात ही लढत भाजप विरुद्ध उर्वरित सर्व पक्ष अशीच असेल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

Pune Mahanagarpalika: भाजपच मुख्य विरोधक

2017 मध्ये विक्रमी 98 जागा जिंकणारा भाजप यावेळीही 120 नगरसेवक निवडून आणण्याचा दावा करत आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी यांच्यासाठी भाजप हा प्रमुख विरोधक आहे.

Pune Mahanagarpalika: राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटीचा फायदा भाजपला?

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील फूट यावेळी भाजपसाठी फायदेशीर ठरू शकते. दोन्ही पक्षांचे उमेदवार समोरासमोर आल्यास मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे. इंग्रजी वृत्तपत्रांतील विश्लेषणानुसार, ही मतविभागणी भाजपच्या पथ्यावर पडू शकते.

Pune Mahanagarpalika: महाविकास आघाडीत जागावाटपाची उत्सुकता

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना ठाकरे गट यांची महाविकास आघाडी पुण्यात एकत्र निवडणूक लढवणार आहे. मात्र, जागावाटप हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. वडगाव शेरी, हडपसर, खडकवासला भागात राष्ट्रवादीची ताकद आहे, तर कसबा पेठ, पुणे कॅन्टोन्मेंट परिसरात काँग्रेस आणि शिवसेनेचा प्रभाव आहे.

Pune Mahanagarpalika: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का?

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार का, याबाबत चर्चा सुरू आहे. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या भूमिकेमुळे सध्या या चर्चेला विराम मिळाला असला, तरी निवडणुकीआधी राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Pune Mahanagarpalika: मनसेची भूमिका निर्णायक

मनसेची भूमिकाही यावेळी महत्त्वाची ठरणार आहे. 2012 मध्ये 28 नगरसेवक निवडून आणणाऱ्या मनसेला 2017 मध्ये केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागले. आता मनसे आणि शिवसेना एकत्र आल्यास पुण्यातील काही भागांत राजकीय समीकरणे बदलू शकतात.

Pune Mahanagarpalika:  पुणे महानगरपलिकेची प्रारूप प्रभागरचना; 41 प्रभाग अन् 165 नगरसेवक 

पुणे महापालिकेच्या निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली आहे, २०१७ च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा प्रभागाची संख्या एकने कमी होऊन ४१ करण्यात आली आहे. सदस्यांची संख्या एकने वाढून १६४ वरून १६५ वर पोहोचली आहे. चार सदस्यांचे ४० आणि पाच सदस्यांचा एक प्रभाग असणार आहे. हरकती आणि सूचनांसाठी ४ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.

फेब्रुवारी २०१७ नंतर आता साडेआठ वर्षांनंतर महापालिकेची निवडणूक होत आहे. २०११ या वर्षाची लोकसंख्या गृहीत धरून प्रभागरचना करावी, अशा सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने ३४ लाख ८१ हजार ३५९ लोकसंख्येनुसार प्रभागरचना केली आहे. यामध्ये अनुसुचित जातीची लोकसंख्या ४ लाख ६८ हजार, तर अनुसूचित जमातींची लोकसंख्या ४० हजार आहे, या लोकसंख्येच्या आधारे १६५ नगरसेवकांची रचना असेल, चार सदस्यांचे ४० आणि पाच सदस्यांचा एक असे ४१ प्रभाग निश्चित केले आहेत, असे पालिका आयुक्त तथा प्रशासक नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले

प्रभाग ०१ - कळस - धानोरीप्रभाग ०२ - फुलेनगर - नागपूर चाळप्रभाग ०३ - विमाननगर - लोहगावप्रभाग ०४ - खराडी - वाघोलीप्रभाग ०५ - कल्याणी नगर - वडगावशेरीप्रभाग ०६ - येरवडा - गांधीनगरप्रभाग ०७ - गोखलेनगर - वाकडेवाडीप्रभाग ०८ - औंध - बोपोडीप्रभाग ०९ - सुस - बाणेर - पाषाणप्रभाग १० - बावधन - भुसारी कॉलनीप्रभाग ११ - रामबाग कॉलनी - शिवतीर्थनगरप्रभाग १२ - छ. शिवाजीनगर - मॉडेल कॉलनीप्रभाग १३ - पुणे स्टेशन - जय जवान नगरप्रभाग १४ - कोरेगाव पार्क - मुंढवाप्रभाग १५ - मांजरी बुद्रुक - साडेसतरा नळीप्रभाग १६ - हडपसर - सातववाडीप्रभाग १७ - रामटेकडी - माळवाडीप्रभाग १८ - वानवडी - साळुंखेविहारप्रभाग १९ - कोंढवा खुर्द - कौसरबागप्रभाग २० - बिबवेवाडी - महेश सोसायटीप्रभाग २१ - मुकुंदनगर - सॅलसबरी पार्कप्रभाग २२ - काशेवाडी - डायस प्लॉटप्रभाग २३ - रविवार पेठ - नाना पेठप्रभाग २४ - कमला नेहरू हॉस्पिटल - रास्ता पेठप्रभाग २५ - शनिवार पेठ - महात्मा फुले मंडईप्रभाग २६ - गुरुवार पेठ - घोरपडे पेठप्रभाग २७ - नवी पेठ - पर्वतीप्रभाग २८ - जनता वसाहत - हिंगणे खुर्दप्रभाग २९ - डेक्कनजिमखाना - हॅप्पी कॉलनीप्रभाग ३० - कर्वेनगर - हिंगणे होम कॉलनीप्रभाग ३१ - मयूर कॉलनी - कोथरूडप्रभाग ३२ - वारजे - पॉप्युलर नगरप्रभाग ३३ - शिवणे - खडकवासलाप्रभाग ३४ - नऱ्हे - वडगाव बुद्रुकप्रभाग ३५ - सनसिटी - माणिक बागप्रभाग ३६ - सहकारनगर - पद्मावतीप्रभाग ३७ - धनकवडी - कात्रज डेअरीप्रभाग ३८ - आंबेगाव - कात्रजप्रभाग ३९ - अप्पर सुपर इंदिरानगरप्रभाग ४० - कोंढवा बुद्रुक - येवलेवाडीप्रभाग ४१ - महंमदवाडी - उंड्री

Pune News: पुण्यात युती-आघाडी सद्यस्थिती

पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार असल्याची घोषणा केली असली, तरी प्रत्यक्षात जागावाटपावरून भाजप–शिवसेनेत तिढा कायम आहे. त्यामुळे अद्याप पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जागांचं अंतिम गणित ठरलेलं नाही.पुणे महानगरपालिकेत एकूण १६५ जागा असून त्यापैकी भाजप १२५ हून अधिक जागा लढवण्याच्या तयारीत आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केवळ १५ जागा देण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती आहे, जो शिवसेनेला मान्य नसल्याचं समजतं. त्यामुळेच शिवसेना वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, आरपीआय भाजपसोबतच निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे.याच पार्श्वभूमीवर शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र यावर अद्याप कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही. दुसरीकडे पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार अशी चर्चा सुरुवातीला होती. यासाठी अजित पवार गट आणि शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका देखील पार पडल्या. मात्र घड्याळ या एकाच चिन्हावर लढण्याचा अजित पवारांचा आग्रह शरद पवार गटाला मान्य नसल्याने या चर्चांना सध्या तरी ब्रेक लागलेला आहे.

दरम्यान, पुण्यात महाविकास आघाडी पुन्हा एकदा सक्रिय झालेली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यात ५०–५०–५० असा प्राथमिक जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे. मनसेला सोबत घेण्याबाबतही चर्चा सुरू असून, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कोट्यातूनच मनसेला जागा देण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.अद्याप महाविकास आघाडीचं अंतिम जागावाटप ठरलेलं नसून, बैठकींचं सत्र सुरूच आहे. पुण्यातील जागावाटपावर अंतिम निर्णय घेण्यासाठी मुंबईतील वरिष्ठ नेतेही पुण्यात दाखल झाले असून, आज अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, महायुतीमध्ये शिवसेनेला सन्मानपूर्वक जागा न मिळाल्याने आणि राष्ट्रवादीचे गणितही न जुळल्याने एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकत्र लढणार का? अशीही चर्चा रंगली आहे. अजित पवार गट शिवसेनेला ४० ते ४४ जागा देण्यास तयार असल्याची माहिती आहे. मात्र यावरही अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

एकूणच पुण्यात आगामी महापालिका निवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी, की भाजप–शिवसेना–राष्ट्रवादी (अजित पवार) विरुद्ध महाविकास आघाडी, की तिरंगी लढत? याबाबत अद्यापही संभ्रम निर्माण झाला आहे.